कल्याण : कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात भटक्या श्वानाने १३० जणांना चावा घेतल्याची माहिती देऊन खळबळ उडवून देणाऱ्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टरांनी अखेर आकडेवारी देताना चूक झाल्याची कबुली दिली आहे. डॉ. संदीप पगारे यांनी महापालिका प्रशासनाकडे दिलेल्या खुलाशात चुकीची आकडेवारी दिल्याचे मान्य केले आहे. दरम्यान, प्रत्यक्षात १३० नव्हे तर ५७ जणांना श्वानाने चावा घेतल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
खडकपाडा परिसरात भटक्या श्वानाने मोठ्या संख्येने नागरिकांना चावा घेतल्याची माहिती डॉ. पगारे यांनी दिल्यानंतर महापालिका प्रशासनात खळबळ उडाली होती. या माहितीची पडताळणी केल्यानंतर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी १३० जणांना श्वानदंश झाल्याची माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट केले.
प्रत्यक्षात केवळ ५७ जणांना भटक्या श्वानांनी चावा घेतल्याचे समोर आले. त्यानंतर डॉ. पगारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिशीला दिलेल्या उत्तरात डॉ. पगारे यांनी आकडेवारी देताना त्यांच्याकडून चूक झाल्याची कबुली दिली आहे. याबाबत मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी माहिती दिली.
नऊ डॉक्टरांच्या बदल्या; पगारे शास्त्रीनगरमध्ये
दरम्यान, महापालिका प्रशासनाने रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयातील नऊ डॉक्टरांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये डॉ. संदीप पगारे यांचाही समावेश असून, त्यांची बदली शास्त्रीनगर रुग्णालयात करण्यात आली आहे. रुग्णालयातील आरोग्य सेवेसंदर्भात घडलेल्या काही वादग्रस्त घटनांच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्याची माहिती आहे.
रेबिज झालेले श्वान विल्हेवाटीवरही प्रश्नचिन्ह
दरम्यान, या प्रकरणाला आणखी एक गंभीर वळण मिळाले आहे. भाजप नगरसेविका खुशबू चौधरी यांनी नुकत्याच झालेल्या महासभेत रेबीज झालेल्या भटक्या श्वानाच्या मृतदेहाच्या विल्हेवाटीचा मुद्दा उपस्थित केला. खडकपाडा परिसरात नागरिकांना चावे घेणाऱ्या श्वानाला नागरिकांनी पकडून महापालिकेच्या श्वान निर्बीजीकरण प्रकल्पात जमा केले होते. त्याला रेबीज झाल्याचे समोर आले आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.