डोंबिवली : चार वेळा व्यवहार करून विश्वास संपादन केला... पाचव्या वेळी मात्र दोघा भामट्यांनी सोनाराला रिकामा केला. बनावट सोन्याच्या ३४ लाॅकेट गहाणवटीतून कल्याण जवळच्या मोहने येथील एका सोने-चांदी विक्री व्यवसाय करणाऱ्या सोनाराची दोघा जणांनी ३० लाख रूपयांची फसवणूक केली आहे. बुधवारी हा प्रकार मोहन्यातील एका सोनाराच्या दुकानात घडला आहे. मोहने बाजारातील साईकुमार ज्वेलर्सचे मालक प्रवीण श्रीरंग करांडे (३९) यांनी या संदर्भात खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी विजेंदर राजपूत (४२) आणि त्याच्या साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यातील आरोपी विजेंदर राजपूत आणि त्याच्या साथीदाराने यापूर्वी तक्रारदार प्रवीण करांडे यांच्याबरोबर अशा प्रकारचे चार वेळा व्यवहार केले आहेत. हे चारही व्यवहार अतिशय चोख असल्याने यावेळीही करांडे यांनी त्यांच्या व्यवहारावर विश्वास ठेऊन आर्थिक व्यवहार केला होता.
या संदर्भात प्रवीण करांडे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मोहने बाजारात आपले साईकुमार ज्वेलर्स नावाने सोने/चांदी दागिने विक्रीचे दुकान आहे. बुधवारी सकाळी आपण दुकानात असताना विजेंदर राजपूत आणि त्याचा एक साथीदार आला. आपल्याकडे सोन्याची एकूण ३४ लाॅकेट आहेत. ती आपणास गहाण ठेऊन त्या बदल्यात आपणास पैसे पाहिजेत असे विजेंदर राजपूत याने दुकानदार करांडे यांना सांगितले. हा व्यवहार करताना इसमांनी आपल्याजवळील सोन्याची लाॅकेट हे ओरीजनल सोन्याची आहेत असा देखावा निर्माण केला.
यापूर्वी विजेंंदर राजपूत याने आपल्या बरोबर सरळमार्गाने लबाडी न करता व्यवहार केला आहे. त्यामुळे त्याने आणलेली ३४ सोन्याची लाॅकेट खरी असावीत, असे वाटल्याने दुकानदार प्रवीण करांडे यांनी ती आपल्या दुकानात गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या बदल्यात बाजारभावाप्रमाणे ३० लाख रूपयांची रक्कम विजेंदर राजपूत आणि त्याच्या साथीदाराच्या हवाली केली. विजेंदर राजपूत आणि त्याच्या साथीदाराने दुकानातून अलगद काढता पाय घेतला. दुकानदार प्रवीण करांडे यांनी गहाण ठेवलेल्या सोन्याच्या लाॅकेटची शुध्दता आणि खरेपणा यंत्रावर तपासला असता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. विजेंदर राजपूत आणि त्याच्या साथीदाराने गहाणवट म्हणून दिलेली सर्व लॉकेट्स सोन्याची नसून ती बनावट असल्याचे सिद्ध झाले.
खडकपाडा पोलिसांना खुले आव्हान
दुकानदार प्रवीण करांडे यांनी तात्काळ राजपूत याच्याशी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला. मात्र त्याने मोबाईल स्विचऑफ केला होता. पसार झालेल्या विजेंदर याचे घर, कार्यालय याची कोणतीही माहिती दुकानदार प्रवीण यांच्याकडे नसल्यामुळे आपण त्यांना कोठेही शोधू शकत नाही. आपणाकडे गहाण ठेवलेले सोन्याचे लाॅकेट बनावट असल्याने त्यांनी आपली फसवणूक केली आहे. आपल्याकडील ३० लाख रूपये घेऊन विजेंदर राजपूत आणि त्याच्या साथीदाराने पसार झाल्याचे प्रवीण करांडे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक आशा निकम आणि त्यांचे सहकारी फरार विजेंदर राजपूत आणि त्याच्या साथीदाराचा शोध घेत आहेत.