

डोंबिवली : कल्याण पूर्वेकडील मलंग रोडने रात्रीच्या सुमारास ये-जा करणाऱ्या प्रवाशांसह पादचारी आणि वाहनचालकांमध्ये सद्या भितीचे वातावरण पसरले आहे. शनिवार/रविवारच्या मध्यरात्री या रस्त्यावर अवतरलेला एक तरूण झिंगलेल्या अवस्थेत हातात कोयता घेऊन ये-जा करणाऱ्या वाहनांना थांबवून धमक्या देत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर धुमाकूळ घालत आहे.
कल्याणच्या मलंग रोडने जायला सारेच घाबरत आहेत. रात्रीच्या या घटनेने परिसरात भितीचे काहूर माजले आहे. पुण्यातील कोयत्या गँगच्या दहशतीनंतर कल्याणमध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या चेतना परिसरात हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये हा तरूण दारूच्या नशेत हातात कोयता घेऊन दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास कोयताधारी तरूणाचा रस्त्यात धिंगाणा घालत असल्याचा व्हिडिओ एका जागरूक नागरिकाने मोबाईलमध्ये कैद करून समाज माध्यमांवर व्हायरल केला आहे.
कल्याण पूर्वेत पूर्वत गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावत चालली आहे. गुंड/गुन्हेगारांना पोलिसांचे भयच उरले नसल्याचे सदर व्हिडिओतून दिसून येत आहे. चेतना नाका परिसरात हा तरूण मद्यधुंद अवस्थेत हातात कोयता आणि धारदार शस्त्र घेऊन रस्त्यावर झिंगत फिरत आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर कोयता उगारत असताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कल्याण पूर्वेकडील कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शनिवारी मध्यरात्रीचा हा व्हिडिओ असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान या प्रकाराचा कोळसेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.