Kalyan East Road Project Pudhari
ठाणे

Kalyan East Road Project: स्मार्ट सिटीच्या नावाखाली जनतेच्या पैशांचा चुराडा? गॅस लाईनसाठी 80 फुटी रस्त्याच्या मधोमध खोदकाम

कल्याणात नियोजनाचा बोजवारा

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: कल्याण पूर्वेतील तिसगांव नाका ते काटेमानिवली नाका हा 25 फुटी रस्ता लवकरच 80 फुटी होणार असतानाच महानगर गॅस कंपनीने याच रस्त्याच्या मधोमध गॅस लाईन टाकण्याचे काम सुरू केले आहे. शासन/प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा हा नमुना असून स्मार्ट सिटीच्या नावाखाली जनतेच्या पैशांची नासाडी केली जात असल्याची टीका या भागातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

प्रशासन सांगते की रस्ता रुंदीकरणाच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत आणि लवकरच काम सुरू होईल. पण दुसरीकडे महानगर गॅस कंपनीकडून तिसगांव नाका ते आझाद प्लंबर या पट्ट्यात अरुंद रस्त्याच्या मध्यभागी खोदकाम करून भूमिगत लाईन टाकत आहेत. उद्या 80 फुट रुंदीचा काँक्रीट रस्ता झाल्यावर हीच लाईन रस्त्याच्या बरोबर मध्यावर येईल. कर्म/धर्म संयोगाने जर का गळती झाली किंवा दुरुस्ती करायची असेल तर नव्याने तयार झालेला कोट्यवधींचा रस्ता पुन्हा फोडावा लागेल.

शहर नियोजन तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही मोठ्या रस्त्याच्या कामात पाणी, ड्रेनेज, गॅस, वीज, ऑप्टिकल फायबर या सर्व युटिलिटी लाईन्स रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्वतंत्र डक्टमध्ये टाकल्या जातात. यामुळे भविष्यात रस्ता न खोदता दुरुस्ती शक्य होते. कल्याणमध्ये मात्र आधी काम करा, मग विचार करा, ही पद्धत अवलंबली जात असल्याचा आरोप होत आहे.

या खोदकामामुळे तिसगांव रिक्षा स्टँडवरील चालकांचे कंबरडे मोडले आहे. संपूर्ण स्टँड खोदून ठेवल्याने व्यवसाय ठप्प झाला आहे. शिवाय ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. शाळेची मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्गाला खड्डे चुकवत चालावे लागत आहे.

एकाच कामासाठी दोनदा खर्च कशासाठी?

केडीएमसीचा शहर अभियंता विभाग आणि महानगर गॅस कंपनीने संयुक्त पाहणी करावी. 80 फुटी रस्त्याचा मंजूर नकाशा समोर ठेवून गॅस लाईन रस्त्याच्या कडेला वळवावी. अन्यथा हाच स्मार्ट सिटीचा प्रकल्प नसून स्मार्ट नासाडीचा प्रकल्प ठरेल, याकडे स्थानिकांनी लक्ष वेधले आहे. एकाच कामासाठी दोनदा खर्च करायचा आणि रहिवाशांना त्रास द्यायचा, हेच का स्मार्ट नियोजन आहे का ? यावर प्रशासनाने उत्तर द्यावे, अशी मागणी पादचारी, वाहन चालक, प्रवासी आणि तिसगांव नाका ते काटेमानिवली नाका रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या रहिवाशांनी केली आहे.

आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, स्मार्ट सिटी प्रकल्प विभाग आणि महानगर गॅस कंपनी या संदर्भात काय भूमिका वजा नियोजन करणार याकडे परिसरातील साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT