HPV Vaccination: एचपीव्ही लसीकरणाला ठाण्यात थंड प्रतिसाद

केवळ चार टक्के लसीकरण; अफवा, संभ्रमामुळे मोहिमेचा वेग मंदावला
HPV Vaccination
HPV VaccinationPudhari
Published on
Updated on

ठाणे: किशोरवयीन मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‌‘एचपीव्ही‌’ लसीकरण मोहिमेला ठाणे विभागात अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे.

ठाणे, पालघर आणि रायगड या तीन जिल्ह्यांतील एकूण 1 लाख 44 हजार 653 पात्र मुलींपैकी आतापर्यंत केवळ 5 हजार 874 मुलींचेच लसीकरण झाले असून हे प्रमाण अवघे चार टक्के इतके आहे. लसीबाबतच्या अफवा, पालकांमधील गैरसमज आणि अपुरी जनजागृती यामुळे मोहिमेचा वेग मंदावल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे.

HPV Vaccination
Food Poisoning Case: एकाच कुटुंबात 22 जणांना अन्नातून विषबाधा; किन्हवलीजवळील शिळ गावातील घटना

भारतामध्ये महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा गंभीर आजार मानला जातो. या आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने 14 वर्षे पूर्ण झालेल्या व 15 वर्षांखालील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू केली आहे.

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ‌‘क्वाड्रीव्हॅलंट एचपीव्ही‌’ लस मोफत उपलब्ध करून देण्यात आली असून ती सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. जगभरातील कोट्यवधी मुलींना ही लस देण्यात आली असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

HPV Vaccination
Wadhavan Port Fraud Case: वाढवण बंदर मोबदल्यात 50 लाखांचा घोटाळा; तिघांवर गुन्हा दाखल

ठाणे विभागातील आकडेवारी पाहता मोहिमेला अपेक्षित गती मिळालेली नाही. ठाणे जिल्ह्यातील 83 हजार 187 पात्र मुलींपैकी 3 हजार 602 मुलींना लस देण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात 35 हजार 596 पात्र मुलींपैकी 1 हजार 571 मुलींनी लस घेतली आहे.

तर रायगड जिल्ह्यात 25 हजार 870 पात्र मुलींपैकी केवळ 701 मुलींचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर जनजागृतीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. सोशल मीडियावर लसीकरणासंदर्भात विविध अफवा पसरवल्या जात असल्याने काही पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

लसीमुळे प्रजननक्षमतेवर परिणाम होतो, भविष्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होतात अशा चुकीच्या समजुती पसरवल्या जात आहेत. मात्र जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या लसीचा प्रजननक्षमतेवर कोणताही दुष्परिणाम होत नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. मुलगी मासिक पाळीत असतानाही ही लस सुरक्षितपणे देता येते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

किशोरवयीन मुलींच्या आरोग्य संरक्षणासाठी एचपीव्ही लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येक पात्र मुलीपर्यंत ही सुविधा पोहोचविण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

- रणजित यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news