शिवसेना ठाकरे गटाच्या पुढाकाराने रिकामे हंडे आणि बादल्या घेऊन कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला  Pudhari
ठाणे

Kalyan News : 'आठ- आठ दिवस पाणी नाही', ऐन गणपतीच्या तोंडावर पाणीबाणी; कल्याणमध्ये ठाकरे गटाचा महापालिकेवर मोर्चा

गणेशोत्सवाच्या तोंडावर पाणीटंचाईने नागरिक त्रस्त; उद्धव ठाकरे गटाचे ठिय्या आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

Kalyan Dombivli Water Scarcity

कल्याण : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना आशेळे परिसरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या आठ दिवसांपासून घरातील नळाला पाण्याचा थेंबही येत नसल्याने संतप्त नागरिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुढाकाराने रिकामे हंडे आणि बादल्या घेऊन कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. यावेळी नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला.

आशेळे परिसरात महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा असल्याने नागरिकांना गेल्या आठवडाभरापासून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घराघरांत तयारी सुरू असताना पाणी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पाणीटंचाईची समस्या संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊनही त्यावर तोडगा निघत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिक आणि महिलांनी रिकामे हंडे-बादल्या घेऊन पालिका मुख्यालयावर धडक दिली. यावेळी पिण्यासाठी तर दूरच, घरगुती वापरासाठी आणि स्वच्छतागृहासाठीही पाणी उपलब्ध होत नसल्याची व्यथा नागरिकांनी मांडली.

मोर्चानंतर उद्धव ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगांवकर, नगरसेविका कीर्ती ढोणे, वंदना महिले, अपर्णा भोईर, स्वप्नाली केणे तसेच नगरसेवक संकेश भोईर आणि राहुल कोट यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. पाणीपुरवठ्याची समस्या तातडीने सोडवण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

‘आम्ही जगायचे कसे?’

आशेळे परिसरातील रहिवासी सिद्धार्थ पवार यांनी सांगितले की, “आठ-आठ दिवस पाणी येत नाही. आम्ही जगायचे कसे? ही समस्या आजची नाही. गेल्या तीन वर्षांपासून परिसरातील नागरिक पाणीटंचाईचा सामना करीत आहेत.”

जया पगारे यांनीही प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. यापूर्वी चार दिवसांतून एकदा का होईना नळाला पाणी येत होते. मात्र, आता आठ दिवस उलटूनही पाणी येत नसल्याने घरातील दैनंदिन कामे, स्वयंपाक, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाला आमची व्यथा कधी समजणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बेकायदा नळजोडण्यांवरून भाजप नगरसेविकेचा आरोप

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपच्या नगरसेविका पूजा गायकवाड यांनीही आशेळे परिसरातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर आवाज उठविला होता. परिसरातील बेकायदा नळजोडण्यांना महापालिका अधिकाऱ्यांची साथ असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच नव्याने उभारल्या जाणाऱ्या बेकायदा चाळींना नळजोडण्या दिल्या जात असताना जुन्या चाळींमधील नागरिकांच्या पाणीटंचाईकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा दावाही गायकवाड यांनी केला होता.

गणेशोत्सवाच्या तोंडावर निर्माण झालेली पाणीटंचाई तातडीने दूर न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा नागरिक आणि आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT