Kalyan Dombivli civic issues Pudhari
ठाणे

Kalyan Dombivli civic issues: निवेदन देण्यापेक्षा व्हिडिओ करा अन् प्रश्न थेट प्रशासनापर्यंत पोहोचवा! कल्याण-डोंबिवलीत नवा ट्रेंड

निवेदनांच्या फेऱ्यांपेक्षा सोशल मीडियावर व्हीडिओंचा दणका

पुढारी वृत्तसेवा

शुभम साळुंके

नेवाळी: आपल्या एखाद्या नागरी समस्येचे निवेदन तयार करायचे, संबंधित विभागाच्या कार्यालयात द्यायचे आणि त्यानंतर त्यावर कारवाईची प्रतीक्षा करायची, अशी सर्वसामान्य नागरिकांची नेहमीची प्रक्रिया असते.

मात्र सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे या प्रक्रियेला आता नवे वळण मिळाले आहे. पुण्यातील संतोष पंडित यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरी प्रश्न थेट प्रशासनासमोर मांडण्याची चर्चा राज्यभरात रंगली आहे.

त्याचे पडसाद कल्याण-डोंबिवली परिसरातही उमटताना दिसत असून, नागरी समस्यांवर थेट व्हिडिओच्या माध्यमातून आवाज उठविणारे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सध्या नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

कल्याण-डोंबिवली परिसरात अनधिकृत बॅनरबाजी, रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे, फुटलेली चेंबरची झाकणे, अनधिकृत वाहन पार्किंग, फुटपाथ अतिक्रमण, कचरा, वाहतूककोंडी यांसारख्या समस्या सातत्याने नागरिकांसमोर येत आहेत.

या समस्यांबाबत संबंधित विभागाकडे तक्रारी किंवा निवेदने देऊनही कारवाईला विलंब होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. अशा वेळी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर घटनास्थळी जाऊन समस्येचा व्हिडिओ तयार करीत असून, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून थेट प्रतिक्रिया घेऊन तो सोशल मीडियावर प्रसारित करीत आहेत. त्यामुळे आपले नाव सोशल मीडियावर खराब होण्याच्या भीतीने अधिकारी तातडीने दखल घेऊन संबंधित विषय मार्गी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहेत.

विशेष म्हणजे एखाद्या समस्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर प्रशासनाकडून तातडीने दखल घेतली जात असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येते. त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांना प्रसिद्धी मिळण्याबरोबरच संबंधित यंत्रणेवरही कारवाईचा दबाव निर्माण होत आहे. परिणामी, निवेदन, पाठपुरावा आणि प्रतीक्षा याऐवजी सोशल मीडिया हा समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रभावी मार्ग ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

कल्याण डोंबिवलीत पुण्यातील संतोष पंडित यांच्या कार्यपद्धतीला अनुसरून सोशल मीडिया इंफ्लून्सर थेट खड्ड्यांभोवती रांगोळ्या, वाहतूक कोंडीचे प्रश्न, फुटपाथ अतिक्रमण यांसह अन्य नागरी समस्या लक्ष करत आहेत. त्यामुळे सध्या कल्याण डोंबिवली मधील लोकप्रतिनिधी पेक्षा सोशल मीडिया इंफ्लूनसर चर्चेत आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT