

ठाणे: ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे सोमवारी झालेल्या पाहणीत समोर आले. रुग्णालयाच्या विविध भागांत अस्वच्छता तसेच दुर्गंधी आढळून आल्याने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (२) मेजर डॉ. नितीन राठोड यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. रुग्णालयातील स्वच्छतेबाबत यापुढे हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
कळवा रुग्णालयात ठाणे शहरासह मुंब्रा, दिवा, कल्याण, उल्हासनगर आणि शहापूर परिसरातील दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक रुग्णालयात येत असतात. त्यामुळे रुग्णांना उपचारांसोबत स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळणे आवश्यक आहे. मात्र, सोमवारी अचानक पाहणी करताना रुग्णालयातील काही भागांत अस्वच्छता आणि दुर्गंधी आढळून आली.
अतिरिक्त आयुक्त डॉ. नितीन राठोड यांनी रुग्णालयातील विविध विभाग, परिसर आणि स्वच्छतागृहांची पाहणी केली. या पाहणी दरम्यान स्वच्छतेच्या कामातील त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्या. यावर त्यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाब विचारत स्वच्छतेच्या कामात कोणतीही कुचराई होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.
रुग्णालय परिसरात नियमितपणे स्वच्छता करणे, जमा झालेला कचरा वेळेत उचलणे तसेच दुर्गंधी निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्याने स्वच्छतेच्या बाबतीत अधिक काटेकोरपणा आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रुग्णालयातील नादुरुस्त वॉर्डच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. हे काम विलंब न करता तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना डॉ. राठोड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. स्वच्छतेसोबतच रुग्णालयाच्या एकूण कामकाजातही सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
‘स्वच्छतेत सुधारणा दिसली नाही तर कारवाई’
रुग्णालयातील स्वच्छता आणि इतर व्यवस्थांमध्ये यापुढे सुधारणा दिसून आली नाही, तर संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल, असा इशारा अतिरिक्त आयुक्त डॉ. नितीन राठोड यांनी दिला. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाकडून आता स्वच्छतेच्या कामाकडे कितपत गांभीर्याने लक्ष दिले जाते, याकडे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे लक्ष लागले आहे.
तत्कालीन बांगरांच्या कारवाईनंतरही पुन्हा प्रश्नचिन्ह
रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न यापूर्वीही ऐरणीवर आला होता. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांनी पाहणी दरम्यान रुग्णालय परिसरातील अस्वच्छतेची गंभीर दखल घेत संबंधित ठेकेदारावर कारवाई केली होती.
त्यानंतर नवीन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली होती. ठेकेदाराच्या कामावर नियमित लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र, आयुक्त बांगर यांच्या बदलीनंतर पुन्हा एकदा रुग्णालयातील स्वच्छतेचा मुद्दा समोर आल्याने प्रशासनाच्या देखरेखीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.