

माणगाव: गणेशोत्सव म्हणजे भक्ती, उत्साह आणि प्रसादाचा आनंद... मात्र, याच सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांवर रायगड जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे.
मिठाई, मावा, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत असताना भेसळयुक्त अथवा असुरक्षित अन्नपदार्थ बाजारात येऊ नयेत, यासाठी तपासणी मोहिमेला वेग देण्यात आला आहे.
गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत ९ लाख ४७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या कारवाईत तब्बल ८७ लाख ५८ हजार १४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच ११ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
३३० अन्न नमुन्यांची तपासणी
जिल्ह्यात आतापर्यंत ३३० अन्न नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १०७ नमुने प्रमाणित, ४ नमुने अप्रमाणित, तर ४ नमुने असुरक्षित आढळले आहेत. संबंधित प्रकरणांमध्ये पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाने जिल्ह्यातील ६१८ आस्थापनांची तपासणी केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १२१ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या असून, ८ जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
गुटखा-पानमसाल्यावरही कारवाईचा दणका
प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याच्या विक्रीविरोधातही प्रशासनाने मोहीम तीव्र केली आहे. जिल्ह्यात ३१ कारवाया करण्यात आल्या असून, या कारवाईत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.१,६६६ लिटर दूध व दुग्धजन्य पदार्थ जप्तदूध व दुग्धजन्य पदार्थांबाबतही प्रशासनाने विशेष लक्ष दिले आहे.
भेसळीचा संशय असलेले तसेच विनापरवाना विक्री होत असलेले १,६६६ लिटर दूध व दुग्धजन्य पदार्थ जप्त करून नष्ट करण्यात आले. या जप्त मालाची किंमत सुमारे ८४ हजार रुपये आहे.११३ जणांवर दंडात्मक कारवाईविविध प्रकरणांमध्ये ११३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, या कारवाईतून ९ लाख ४७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या कारवाईत ८७ लाख ५८ हजार १४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नियम धाब्यावर बसवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे.
गणेशोत्सवात मिठाई-माव्यावर विशेष ‘फोकस’
गणेशोत्सवाच्या काळात मिठाई, मावा, दूध, दुग्धजन्य पदार्थ तसेच विविध खाद्यपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे मिठाई व मावा उत्पादक आस्थापने, हॉटेल, रेस्टॉरंट तसेच खाद्यपदार्थ विक्री केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.तपासणीदरम्यान भेसळयुक्त अथवा असुरक्षित अन्नपदार्थ आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
सणाचा आनंद घेताना नागरिकांच्या ताटात जाणारा प्रत्येक घास सुरक्षित असावा, यासाठी अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता तपासण्यावर प्रशासनाचा भर आहे.नागरिकांनीही भेसळखोरांविरोधातील लढ्यात प्रशासनासोबत नागरिकांची जागरूकताही महत्त्वाची आहे. मिठाई, मावा, दूध किंवा अन्य खाद्यपदार्थ घेताना दर्जा, पॅकिंग, उत्पादन तारीख आणि वापरण्याची अंतिम तारीख तपासावी. अन्नपदार्थ संशयास्पद वाटल्यास वा भेसळ आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता संबंधित प्रशासनाकडे तक्रार करावी.
“सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन तपासणी मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. नागरिकांनी अन्नपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याचे आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधून तक्रार करावी.”
- मिलिंद महांगडे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, रायगड