Kalyan Dombivli Highest Night Temperature Pudhari
ठाणे

Kalyan Dombivli Temperature | सूर्याचा प्रकोप! कल्याण-डोंबिवलीत रात्री ३०.४ अंश; १३ वर्षांतील सर्वोच्च तापमान

एमएमआरसह उत्तर कोकण होरपळले

पुढारी वृत्तसेवा

Kalyan Dombivli Highest Night Temperature

डोंबिवली : सूर्य मावळला...पण उष्णतेचा कहर काही थांबेना. दिवसभर आग ओकणाऱ्या सूर्याचा प्रकोप आता रात्रीही जाळत आहे. कल्याण-डोंबिवलीने यंदा उष्णतेचे सर्व विक्रम मोडीत काढले. शुकवारी रात्रीचे किमान तापमान ३०.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. गेल्या १३ वर्षांतील ही सर्वाधिक उष्ण रात्र ठरल्याचा दावा हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना केला.

संपूर्ण एमएमआर भट्टीसारखा तापला

उष्णतेची ही लाट केवळ कल्याण-डोंबिवलीपुरती मर्यादित नाही. मुंबई, ठाणे, पनवेल, अंबरनाथ, विरार, बदलापूर, कर्जतसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश आणि उत्तर कोकणातील नागरिकांना उष्ण रात्रींनी हैराण केले. अनेक शहरांनी गेल्या दशकभरातील सर्वाधिक उष्ण रात्रीचा अनुभव यंदा घेतला. सूर्याचा प्रकोप सद्या इतका आहे की, रात्री एसी/कुलरशिवाय झोप लागणे मुश्कील झाले आहे. मान्सूनचे आगमन हाच एकमेव दिलासा. तोपर्यंत काळजी हाच बचाव करावा लागणार आहे.

रात्रीही घामाच्या धारा...कारण काय ?

वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण ८० टक्क्यांच्या वर गेले आहे. त्यात ढगाळ आकाश आणि मंद वारे यामुळे दिवसभर इमारती, रस्ते आणि जमिनीत साचलेली उष्णता बाहेरच पडत नाही. ती कोंडली जाते. त्यामुळे रात्री पारा उतरतच नसल्याचे हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी स्पष्ट केले. दिवसा ४० अंशांच्या वर जाणारे तापमान आणि रात्री ३० अंशांवर मुक्काम, यामुळे शरीराला विश्रांतीच मिळत नसल्याचे ते म्हणाले.

आकडे बोलतात : कुठे अन् किती तापमान ?

उत्तर कोकणाने शुक्रवारी उष्णतेचे सर्व उच्चांक मोडले. कल्याण-डोंबिवली ३०.४ अंशांसह सर्वात पुढे होते. पनवेल-पलावा ३०.३, बिरवाडी ३०.२, अंबरनाथ व विरार ३०.१, तर ठाणे-नवी मुंबईत ३० अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. एकाही शहरात पारा २९ अंशांच्या खाली उतरला नाही.

बदलापूरची तर हॅटट्रिक चुकली

बदलापूरमध्ये तर उष्णतेचा कहर काही वेगळाच होता. तेथे ४ दिवसांत दोनदा रात्रीच्या तापमानाचा १३ वर्षांचा विक्रम मोडला गेला. मंगळवारी २६ मे रोजी २९.४ अंश नोंद होऊन २०२४ सालचा २९.३ अंशांचा विक्रम मोडला. त्यानंतर अवघ्या ४ दिवसांत शनिवारी २९.८ अंशांची नोंद होऊन पुन्हा नवीन उच्चांक प्रस्थापित झाला.

मान्सून येईपर्यंत सावध रहा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नैऋत्य मोसमी वारे पूर्णपणे सक्रिय होईपर्यंत उष्ण आणि दमट रात्रींचा हा सिलसिला कायम राहणार आहे. उष्माघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी दुपारी १२ ते ४ बाहेर पडणे टाळावे. दिवसभरात किमान ३ ते ४ लिटर पाणी प्यावे. सुती आणि सैल कपडे वापरावेत. लहान मुले, गरोदर महिला आणि ज्येष्ठांनी विशेष काळजी घ्यावी. रात्री झोपताना खोलीत हवा खेळती राहील याची काळजी घ्या, असा सल्ला हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT