Kalyan Congress Protest : इंधन दरवाढीचा उडाला भडका... काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष्यांनी घोड्यावरुन वाटली ‘मेलोडी’ चॉकलेट!

कल्याणच्या तहसील कार्यालयावर काँग्रेस पक्षातर्फे इंधन दरवाढी विरोधात आंदोलन
Kalyan Congress Protest
कल्याणच्या तहसील कार्यालयावर काँग्रेस पक्षातर्फे इंधन दरवाढी विरोधात आंदोलन
Published on
Updated on

डोंबिवली : महिन्याभरात ४ वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या केंद्र सरकारविरोधात काँग्रेस आता आक्रमक झाली आहे. कल्याण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. नवीन सिंग यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी कल्याणात अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडण्यात आले. कल्याणच्या तहसील कार्यालयावर धडक देऊन आंदोलकांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. हे आगळेवेगळे आंदोलन पाहण्यासाठी कल्याणकारांनी परिसरात मोठी गर्दी केली होती.

घोड्यावरून मेलोडी चॉकलेट वाटली

इंधन दरवाढीमुळे दुचाकी-चारचाकी परवडेनाशी झाल्याने आता घोड्यावरूनच प्रवास करावा लागेल, असा टोला लगावत जिल्हाध्यक्ष ॲड. नवीन सिंग थेट घोड्यावर स्वार होऊन आंदोलनात उतरले. पेट्रोल १२० रुपयांवर गेलं, गॅस ११०० रुपयांवर गेला. महागाई इतकी वाढली की जनतेचं आयुष्य मेलोडीसारखं कडू झालंय, असे म्हणत त्यांनी उपस्थित नागरिकांना वाटसरूंना मेलोडी चॉकलेट वाटली. खा मेलोडी, सहन करा महागाई...अशा घोषणांनी कल्याण तहसील परिसर दणाणून गेला. या आंदोलनात महिला काँग्रेस अध्यक्षा प्रियांका देशमुख, युवक काँग्रेस अध्यक्ष सचिन गुप्ता, माजी नगरसेवक रमेश भोईर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. महागाई हटाओ, देश बचाओ, भाजपा सरकार हाय हाय, अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता.


तहसीलदारांकडे दरवाढ मागे घेण्याची मागणी

आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने कल्याण तहसीलदारांची भेट घेऊन पंतप्रधानांच्या नावे निवेदन दिले. महिन्याभरात पेट्रोल डिझेल घरगुती गॅस, खाद्यतेल, डाळींचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. तातडीने इंधनावरील अबकारी कर कमी करून पेट्रोल-डिझेलचे दर ८० रूपयांच्या खाली आणावेत, अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली.

निवडणुकीनंतर दरवाढीचा सपाटा

जिल्हाध्यक्ष ॲड. नवीन सिंग यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. निवडणुकीच्या तोंडावर २ रुपये कमी करून जनतेची दिशाभूल केली. निवडणूक संपली की पुन्हा दरवाढीचा सपाटा लावला. हे सरकार केवळ उद्योजकांच्या तुंबड्या भरण्यासाठी आहे. गरिबाच्या ताटातील भाकरीही हिसकावून घेतली, असा आरोप त्यांनी केला. इंधन दरवाढीचे चटके फक्त वाहनधारकांनाच नाही तर भाजीपाल्यापासून ते सर्व जीवनावश्यक वस्तूंना बसत आहेत. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा काँग्रेसचा हा लढा अधिक तीव्र होईल, असाही इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news