डोंबिवली (ठाणे) : कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्याचे झपाट्याने नागरीकरण होत आहे. तथापी एकीकडे नागरीकरण सुरू असतानाच दुसरीकडे मात्र बांधकाम व्यवसायिकांचा बेफिकीर कारभार दिसून येतो.
ज्या भागात छोट्या-मोठ्या इमारतींचे बांधकाम सुरू असते त्या भागात मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर, तसेच फुटपाथवर खडी, रेती, लोखंडी शिगा पडलेल्या असतात. त्यामुळे वर्दळीचे रस्ते आणि अस्तित्वात असलेल्या फूटपाथ चालण्यासाठी बंद होतात. शिवाय निर्माणाधीन इमारतीच्या बांधकामासाठी लागणार्या साहित्यामुळे वाहतूककोंडी देखिल होत असते.
वाहनांसाठी रस्ते आणि चालणार्यांकरित फूटपाथ मोकळे ठेऊनच विकासकांनी बांधकाम करताना खबरदारी घेतली पाहिजे. पदपथ आणि रस्ते अडविणार्यांवर कठोर कारवाई करण्याचा महापालिकेचे नियम आहेत. तरीही नियमांना न जुमानता काही विकासक राजकीय आणि वरिष्ठ स्तरावरून दबाव आणतात. असे अनेक जण कारवाईत अडथळा आणत असल्याच्या केडीएमसी अधिकार्यांच्या तक्रारी आहेत. रहिवाशांच्या तक्रारी आल्या की अशा बांधकामांच्या ठिकाणी जाऊन अधिकारी तेथील रस्ते आणि पदपथ अडवून टाकलेले साहित्य बाजुला करण्यास सांगितात. मात्र विकासकांकडून तात्काळ वरिष्ठ स्तरावरून किंवा काही राजकीय व्यक्तिंचा दबाव आणला जातो. त्यामुळे कारवाईत अडथळा येत असल्याचे स्थानिक अधिकार्यांनी सांगितले.
रात्रीच्या सुमारास बांधकामांच्या ठिकाणी अवजड मालवाहू वाहने येऊन उभी राहतात. या वाहनांचा वाहतुकीला अडथळा होतो. अनेक ठिकाणी बांधकामांच्या ठिकाणी जेसीबी/पोकलने आणून उभी केली जातात. या वाहनांमुळे तर वाहतुकीला नेहमीच अडथळा निर्माण होतो. गेल्या काही महिन्यांपासून अनेक ठिकाणी अशी वाहने एकाच ठिकाणी उभी असल्याचे चित्र कल्याण-डोंबिवलीतील वेगवेगळ्या भागात आहे. त्यामुळे आपली वाहने वळविताना चालकांना कसरत करावी लागते. काँक्रिटीकरणामुळे गटारे आणि पदपथ उंच झाले आहेत. अनेक पादचारी पाय घसरून पडण्याच्या भीतीने रस्त्याच्या कडेने चालतात. काही ठिकाणी पदपथ बांधकाम साहित्यांनी वेढलेले असताना रस्त्यावर खडी, लोखंडी, बांधकामाचे साहित्य टाकून रस्ता अडवून ठेवला जात आहे.
सद्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने अशा अडगळीच्या सामानामुळे पादचार्यांना चालणे अवघड होते. शहराच्या अनेक भागात काँक्रीट रस्ते आणि गटारांची कामे संथगतीने सुरू आहेत. या कामांमुळे रस्ते वाहतुकीत अडथळा येत आहे. रहिवासी हैराण झाले आहेत. या रस्त्यांवरून शाळेच्या बस धावतात. बस चालकांना कसरत करत या रस्त्यांवरून बस न्याव्या लागतात. अनेक बांधकामांच्या ठिकाणी लोखंडी गज वाकविण्याकरिता परिसरातील झाडांचा वापर केला जात होता. हा प्रकार जागरूक रहिवाशांनी उघडकीस आणल्यावर केडीएमसीने त्या भागातील लोखंडी गज वाकविण्याच्या झाडाला लावलेल्या कैच्या तोडून टाकल्या. अशा गंज चढलेल्या गज वजा लोखंडी सळ्यांपासून पादचार्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये ठाणे जिल्ह्यात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला स्थान जरी मिळाले नसले तरीही केडीएमसीने सार्वजनिक स्वच्छतेसह बांधकामांच्या माध्यमातून सुरू असलेल्या अडगळ आणि घाण/कचर्याकडे लक्ष देण्याची मागणी संबंधित परिसरातील रहिवासी करत आहेत. काँक्रीटचे रस्ते, स्वच्छता, फेरीवाले, जंतुनाशक औषधांची फवारणी कितपत केली आहे हे पाहणीसाठी केडीएमसीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी वातानुकूलित कार्यालयांत बसून बैठका घेण्या ऐवजी स्वत:सह समपदस्थ अधिकार्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरण्याची मागणी होत आहे.