

डोंबिवली (ठाणे ) : कल्याणात न्यायालयाच्या स्वतंत्र इमारतीच्या उभारणीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन देणारे भारतीय न्यायव्यवस्थेतील ख्यातनाम विशेष सरकारी वकील आणि अलीकडेच महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले खासदार अॅड. उज्वल निकम यांचा सत्कार सोहळा गुरूवारी (दि.24) सायंकाळी कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेच्यावतीने उत्साहात पार पडला. यावेळी साहित्य संमेलनाध्यक्ष अॅड. विलास नाईक यांचा सन्मान करण्यात आला.
हा सोहळा केवळ सन्मानापुरता न राहता संपूर्ण वकिली समाजासाठी एक प्रेरणादायी पर्वणी ठरल्याचे कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश जगताप यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्षीय भाषणात सांगितले. यावेळी अॅड. जगताप यांनी अॅड. उज्वल निकम यांच्या असामान्य न्यायकारकिर्दीचा मागोवा घेत त्यांच्या कार्यशैलीची आणि नीतिमत्तेची प्रशंसा केली. अॅड. निकम हे न्याय, निष्ठा आणि राष्ट्रहित यांचे जिवंत प्रतीक आहेत. त्यांनी १९९३ सालात झालेला बॉम्बस्फोट, जिवंत पकडला गेलेला अतिरेकी अजमल कसाब याचा खटला, प्रशांत पुजारी, मनोहर नायक यांसारख्या महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये आरोपींना शिक्षा मिळवून दिली आणि न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कायम राखल्याचेही अॅड. जगताप यांनी नमूद केले. ॲड. निकम यांचे संसदेत पोहोचणे ही संपूर्ण वकिली समाजासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांनी त्यांच्या संयम, शिस्त आणि धारदार वकृत्वाने आम्हा सर्वांना प्रेरणा दिल्याचेही ॲड. जगताप यांनी स्पष्ट केले.
सत्काराला उत्तर देताना अॅड. उज्वल निकम भावूक झाले होते. ते म्हणाले मी आजही स्वतःला वकीलच समजतो. खासदार झालो असलो तरी माझे आत्मभान कोर्टाच्या पायऱ्यांवरच आहे. आजच्या काळात वकिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वकील संरक्षण कायदा ही काळाची गरज आहे. मी स्वतः नगर जिल्ह्यातील राहूरी येथे एका आढाव दांपत्य अधिवक्त्याच्या खून प्रकरणाचा खटला चालवत आहे. या अनुभवातून मला जाणवले की वकिलांसाठी सुरक्षिततेचे कवच असणे अत्यंत आवश्यक आहे. कल्याण न्यायालयासाठी स्वतंत्र इमारत उभी राहावी यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन ॲड. निकम यांनी शेवटी बोलताना दिले.
याच कार्यक्रमात अलिबाग येथील ज्येष्ठ वकील आणि नुकतेच निवड झालेले जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अॅड. विलास नाईक यांचाही अॅड. उज्वल निकम यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
साहित्य आणि वकिली क्षेत्राची सुसंवादात्मक सांगड घालणाऱ्या अॅड. नाईक यांच्या कार्याला संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या रूपाने मिळालेली मान्यता ही संपूर्ण वकिली समाजासाठी अभिमानास्पद आहे, असा सूर उपस्थितांमध्ये दिसून आला.
कार्यक्रमाप्रसंगी संघटनेचे ज्येष्ठ वकील सदस्य, महिला अधिवक्त्या, नवोदित वकील बांधव आणि संपूर्ण कार्यकारिणी उत्स्फूर्तपणे उपस्थित होती. कार्यक्रमाचा समारोप करताना कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश जगताप म्हणाले, या सत्कारामुळे आम्ही केवळ व्यक्तींचा गौरव केला नाही, तर वकिलीच्या मूल्यांचे पुनर्पुष्टीकरण केले आहे. ॲड. उज्वल निकम आणि ॲड. विलास नाईक हे आमच्यासारख्या नव्या पिढीच्या वकिलांसाठी दीपस्तंभ ठरावेत, अशीही प्रशंसा ॲड. जगताप यांनी केली.