Municipal Election Candidate Money Pudhari
ठाणे

KDMC Election: शिंदेसेनेचा भाजपा कार्यकर्त्यांवर पैसे वाटपाचा आरोप; उमेदवारांमध्ये राडा

पॅनल क्रमांक 29 मध्ये शिंदेगट–भाजप आमनेसामने; आरोप-प्रत्यारोप, मारहाण व दडपशाहीच्या तक्रारींमुळे निवडणूक प्रचाराला वादळ

पुढारी वृत्तसेवा

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूकीचा प्रचार अंतीम टप्प्यात पोहोचला असताना डोंबिवलीतील पॅनल क्रमांक 29 मधून शिवसेना शिंदे गट व भाजपा युतीचे उमेदवार एकमेकांविरोधात इर्षेला पेटले आहेत. शिंदे सेनच्या उमेदवाराने भाजपचे कार्यकर्ते पैसै वाटप करीत असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष यांनी शिवसेना शिंदे गटाचा आरोप खोटा असून आमचे कार्यकर्ते प्रचार पत्रके वाटत असताना त्यांच्या खिशात पैसे कोंबून त्यांना मारहाण केली. ही दादागिरी दडपशाही आम्ही सहन करणार नाही असा इशारा शिवसेना शिंदे गटाला दिला आहे.

केडीएमसी निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना शिंदे गटाची युती असताना केवळ पॅनल क्रमांक 29 या एकाच पॅनलमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना शिंदेगट अशी चुरशीची लढत होत आहे. या पॅनल क्रमांक 29 अ मधून भाजपच्या चार उमेदवारांविरोधात शिंदे सेनेचे चार उमेदवार उभे राहिले आहेत. या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांमध्ये शिंदे सेनेचे चार उमेदवार माजी नगरसेवक असून भाजपाचा एक उमेदवार माजी नगरसेवक असल्याने खरी लढत या पाच माजी नगरसेवकांची पालिकेत पुन्हा प्रवेश करण्यासाठी धडपड करीत आहेत.

या पॅनल मधील भाजपाच्या कविता म्हात्रे यांच्या विरोधात शिवसेनेच्या रुपाली म्हात्रे, ब मधून भाजपच्या आर्या नाटेकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या रंजना पाटील, क मधून भाजपचे मंदार टावरे यांच्या विरोधात शिवसेनेचे नितीन पाटील हे उमेदवार आहे. ड मधून भाजपच्या अलका म्हात्रे यांच्या विरोधात शिवसेनेचे रवी पाटील उभे ठाकले आहे. पॅनल क्रमांक 29 मधून शिवसेनेकडून उमेदवार नितीन पाटील यांनी सांगितले की, गेल्या महिन्यापासून त्यांचे सगळी पोल खोल केली आहे. आयरे गाव आणि सुनिल नगर येथे बेकायदा बांधकामे करतात. दुसरा ठेकादार ओमनाथ नाटेकर आला आहे. दशरत भवनमध्ये भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटत होते. तीन हजार रुपये प्रत्येक पाकिटात देण्यात आले आहे. भाजपचे विषू पेंडणेकर हे बिनविरोध निवडून आले. त्याचे कार्यकर्ते पाकिटे वाटत होते. प्रत्येकाच्या घरात पाकिटे टाकून जातात. सरळ मार्गाने नितीन पाटीलला हरवू शकत नाही. म्हणून असले धंदे करणार. एआयच्या माध्यमातून प्रचार करुन मला गुंड ठरविण्यात येत आहे. यांच्याविरोधात कारवाई झाली. त्यांचा एक उमेदवार मंदार टावरे हा यापूर्वीच डिक्वालीफाई आहे. त्याला महापालिकेने अहवाल दिला आहे.

भाजपचे कार्यकर्ते प्रचार पत्रके वाटत होते : नंदू परब

पाटील यांच्या आरोपापश्चात भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी सांगितले की, शिंदे सेनेचे उमेदवार रवि पाटील आणि नितीन पाटील यांच्या कार्यालयाजवळ आमचे भाजपचे कार्यकर्ते प्रचार पत्रके वाटप करत होते. त्यांना जबरदस्तीने पकडून मारहाण करण्यात आली. त्यांच्या खिशात जबरदस्तीने पैसे टाकले गेले. आमचे कार्यकर्ते पैसे वाटप करीत असल्याचा खोटा आळ शिवसेना शिंदे गटाने केला आहे. हा आमच्यावरील अन्याय आहे. याचा आम्ही निषेध करतो. कोणत्याही ऑफिसच्या बाजूला, घराच्या बाजूला कोणीही पैसे वाटू शकत नाही. साधे प्रचार पत्रके वाटू देत नसतील तर हा आमच्यावरचा अन्याय आहे. याप्रकरणाची चौकशी व्हावी. आमच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही आणि दादागिरी आहे. हे आम्ही सहन करणार नाही. हा सगळा प्रकार भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना सांगण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT