Kalyan Dombivli official harassment case  Pudhari
ठाणे

KDMC News | कामावरून काढण्याची धमकी: महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी; 'केडीएमसी'तील अधिकाऱ्याची चौकशी

प्रशासनाकडून अद्याप कारवाई नाही, अधिकाऱ्याच्या कारनाम्याची पोलिसांकडून चौकशी सुरू

पुढारी वृत्तसेवा

Kalyan Dombivli official harassment case

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने ब्लॅकमेल करत एका महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गंभीर प्रकरणी केडीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करून देखील ब्लॅकमेल करणारा वरिष्ठ लिपीक भूषण पाटील याच्या विरोधात कोणतीही कारवाई न झाल्याने पीडित महिला कर्मचाऱ्याने मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी भूषण पाटील याच्या कारनाम्यांची चौकशी सुरू केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे भूषण पाटील याच्या विरोधात आणखी काही महिलांनी अशा प्रकारचे आरोप केल्याची माहिती देखिल उजेडात येऊ लागल्या आहेत.

१५ जानेवारी ते १६ फेब्रुवारी या कालावधीत कल्याण-डोबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूका होत्या. या निवडणुकांच्या अनुषंगाने २४ वर्षीय पीडित महिला कर्मचाऱ्याला डोंबिवलीतील हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडा संकुलाजवळच्या सावित्रीबाई फुले कलामंदिरात उघडलेल्या एक खिडकी योजनेच्या ठिकाणी आवक-जावक रजिस्टर भरण्याचे काम दिले होते.

१७ जानेवारी रोजी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास कामाच्या संदर्भात पीडित महिला कर्मचाऱ्यासोबत भूषण पाटील याच्याशी वाद झाला. अन्य कर्मचाऱ्यांसामोर भूषण पाटील याने त्या कर्मचारी महिलेस तुला काम येत नाही, असे हिणवून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. अन्य कर्चमाऱ्यांनी त्याला थांबविले. हे प्रकरण ताजे असताना भूषण पाटील याने २० फेब्रुवारी रोजी रात्री ८.०७ वाजण्याच्या सुमारास पीडित कर्मचारी महिलेस व्हॉट्स ॲपद्वारे फोन केला.

तुझ्यासह आणखी एकाला कामावरून काढण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. त्याने माझ्याशी सेटलमेंट केली आहे. त्याच्या विरोधातील कारवाई मी थांबविली आहे. मात्र, तू मला काय देशील ? असा सवाल भूषण पाटील याने उपस्थित करताच कर्मचारी महिलेने हुडी किलेवा एअरबड किंवा चॉकलेट देण्याची तयारी दर्शविली. मात्र, भूषण पाटील याने तुझ्याकडून मला शरीरसुख हवे आहे, अशी धक्कादायक मागणी केली.

हे ऐकून महिला कर्मचारी खजिल झाली. त्यानंतरही भूषण पाटील याने वारंवार विनाकारण फोन करून त्रास देत असल्याने तिने हा सारा प्रकार वरिष्ठांना सांगितला. मात्र, वरिष्ठांकडून पाटील याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर या कर्मचारी महिलेने मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. पोलिसांनी पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीला पोलिसांकडून नोटीस

एकीकडे या संदर्भात वरिष्ठ पोलिस निरिक्षक संदीपान शिंदे यांनी सांगितले की, भूषण पाटील याच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला नोटिस दिली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणी ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांनी सांगितले की, संबंधित प्रकरणाची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र या घटनेनंतर केडीएमसी वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT