योगेश गोडे
सापाड : कल्याणडोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच शहराच्या राजकारणात मोठ्या हालचालींना वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने 15 जानेवारी रोजी मतदान होणार असल्याची घोषणा केल्यानंतर इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी, या वेळी अनेक पक्षांतर्गत नाराजीही उफाळून येताना दिसत आहे. विशेषतः शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तिकीट वाटपाच्या प्रक्रियेमुळे अस्वस्थता वाढली असून, याचा फायदा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना कल्याण डोंबिवलीत मोठा वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे शहराच्या राजकारणातील सत्तासमीकरणे बदलण्याची संधी असते. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका जाहीर होताच प्रत्येक पक्षाने तयारीला सुरुवात केली आहे. प्रभागनिहाय आढावे, संभाव्य उमेदवारांची चाचपणी, जातीय व स्थानिक समीकरणांचा अभ्यास सुरू झाला आहे. मात्र, तिकीट मिळेल की नाही या संभ्रमात अनेक इच्छुक उमेदवार सध्या अस्वस्थ आहेत.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये अनेक निष्ठावान कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांना यंदा उमेदवारी न मिळण्याची भीती आहे. पक्ष विस्ताराच्या नावाखाली इतर पक्षातून आलेल्या ‘आयात’ उमेदवारांना प्राधान्य दिले जात असल्याची भावना स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये बळावत आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी झटायचे आणि निवडणुकीच्या काळात फक्त बॅनर लावायचे आणि प्रचार करायचा, पण उमेदवारी मात्र बाहेरून आलेल्या आयतांना मिळणार असेल तर वर्षानुवर्षे पक्षाशी एकनिष्ठ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे अस्थित्व का? असा सवाल अनेक निष्ठावान कार्यकर्ते खुलेआम करत आहेत.
शहरातील विविध भागांमध्ये झालेल्या अंतर्गत बैठकींमध्ये कार्यकर्त्यांचा संताप स्पष्टपणे दिसून येत आहे. अनेकांनी पक्ष नेतृत्वावर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली असून, आमचे अस्तित्व तरी काय?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याच नाराजीतून आता अनेक इच्छुक उमेदवार पर्यायी राजकीय वाटा शोधताना दिसत आहेत. हीच नाराजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी संधी ठरत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीने स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, नाराज उमेदवारांशी संपर्क वाढवला आहे. शिवसेना, भाजपसह मागील निवडणुकीत थोड्या मतांनी पराभूत झालेले काही अपक्ष उमेदवारही राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत शिवसेना, भाजप आणि अपक्ष अशा विविध राजकीय पार्श्वभूमीचे इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. यामुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतील अशा चर्चांना पालिका वर्तुळात उधाण आले आहे.