

रवींद्र डोंगरे, कोल्हापूर
अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत वाल्मीक कराडप्रकरणी धनंजय मुंडेंची विकेट पडली. त्यानंतर विधानसभेत रमीचा डाव मांडल्याप्रकरणी आणि सदनिका घोटाळ्याप्रकरणी माणिकराव कोकाटे अडचणीत आले. अखेर त्यांचाही राजीनामा घेण्याची नामुष्की अजित पवारांवर आली. काही दिवसांपूर्वी दादांचे पुत्र पार्थ पवारांचे नाव पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात पुढे आले. अजित पवारांच्या मागे जणू अडचणींचे शुक्लकाष्ठच लागले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अजित पवारांना सातत्याने अडचणींचा सामना करावा लागतोय. ‘कठोर प्रशासक’ आणि ‘स्वच्छ नेतृत्व’ असलेले अजित पवार राष्ट्रवादीतील मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे घायकुतीस आले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मात्र, अलीकडील काही घडामोडींमुळे या पक्षासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकीय कोंडी झाली आहे. आधी संतोष देशमुख हत्याकांडात धनंजय मुंडे यांना मंत्रिपद गमवावे लागले, त्यानंतर माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद गेले आणि आता पार्थ पवार यांचे पुण्याच्या मुंढवा जमीन घोटाळ्यात नाव घेतले जात आहे. या सलग घटनांचा राजकीय अर्थ काय आणि याचा अजित पवारांच्या प्रतिमेवर काय परिणाम होतोय, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.
अजित पवार हे आक्रमक, निर्णयक्षम आणि प्रशासकीय पकड असलेले नेते म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात. सत्तेत राहून काम करून दाखवणे, विकासाचे मुद्दे पुढे नेणे, ही त्यांची राजकीय ओळख आहे. मात्र, त्यांच्या जवळच्या किंवा पक्षातील प्रमुख नेत्यांवर भ्रष्टाचार, जमीन घोटाळे, वादग्रस्त व्यवहारांचे आरोप होत राहिल्यास ‘नैतिक जबाबदारी’ हा मुद्दा पुढे येतो. धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणे हे सरकारची स्वच्छ प्रतिमा राखण्यासाठीचे पाऊल मानले गेले, तरीही विरोधक राष्ट्रवादी पक्ष आणि अजित पवारांच्या नेतृत्वाकडे बोट दाखवत आहेत.
पार्थ पवार यांचे पुण्याच्या मुंढवा येथील जमीन खरेदीचे प्रकरण वेगळ्या पातळीवर महत्त्वाचे ठरते. पवार कुटुंब हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी घराणे आहे. त्यामुळे पार्थ पवारांवर आरोप झाले ते केवळ आरोप न राहता संशय बळावतो. ‘पक्ष वेगळा, पण प्रवृत्ती तीच’ असा आरोप विरोधक करत आहेत. यामुळे अजित पवारांची प्रतिमा मलीन होतेय का, हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः कोणत्याही प्रकरणात थेट अडकलेले नाहीत. त्यांनी वेळोवेळी ‘चूक असेल तर कारवाई झालीच पाहिजे’ अशी ठाम भूमिका घेतली आहे. मंत्रिपद काढून घेण्याचे निर्णय हे अजित पवारांच्या राजकीय व्यवहार्यता आणि सत्तेतील तडजोडीचे मानले जातात. मात्र, महाराष्ट्रातील सामान्य मतदारांच्या मनात सतत एकाच पक्षाशी निगडित वादग्रस्त प्रकरणे येत राहिली, तर त्याचा परिणाम प्रतिमेवर निश्चितच होतो. आता अजित पवार या अडचणींचा कसा सामना करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
निवडणूक निकालावर ठरेल यश-अपयश
अशा प्रतिकूल परिस्थितीत आज लागणार्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीतील यश-अपयश यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव किती, हे स्पष्ट होईल. हा निकाल जानेवारी महिन्यात होणार्या महानगरपालिका निवडणुका लढण्याचे बळ देईल काय, हे काळच ठरवेल.