डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक काळात डोंबिवली सूनीलनगर प्रभागात भाजपा उमेदवाराचे पती सोमनाथ नाटेकर यांच्यावर हल्ला झाल्याच्या प्रकरणात शिंदे गटाचे माजी नगरसेवक नितीन पाटील आणि रवी पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली असून या दोघा भावांसह 12 जणांविरोधात रामनगर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण यांच्या तक्रारीवरून नोंदविण्यात आला आहे.
निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या काळात प्रचारासाठी पैसे वाटप केल्याच्या संशयावरून कारवाई सुरू असताना आरोपींनी पोलिसांच्या वाहनास अडथळा आणून आरडाओरडा केल्याचा आरोप आहे. जमावबंदी आदेशांचे उल्लंघन करत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र पोलिस अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय भाजपाच्या उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला, मारहाण व शिवीगाळ केल्याचा स्वतंत्र गुन्हा देखील नितीन पाटील, रवी पाटील आणि त्यांच्या साथीदारांविरोधात रामनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
शिंदे गटाचे माजी नगरसेवक नितीन पाटील आणि रवी पाटील यांचा जामीन अर्ज कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने दुसऱ्यांदा फेटाळला आहे. भाजप नगरसेविकेचे पती सोमनाथ नाटेकर यांच्यावर निवडणूक काळात धारदार शस्त्राने हल्ला व मारहाण केल्याप्रकरणी खुनाचा प्रयत्न आणि बेकायदा जमाव जमवल्याच्या गुन्ह्यात रामनगर पोलिसांना पाटील बंधू चौकशीसाठी हवे आहेत.
हल्ल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या पाटील बंधूंनी जामिनासाठी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने प्रथम कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात जाण्याचे निर्देश देत त्यांचा अर्ज फेटाळला. त्यानंतर कल्याण सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत तपासासाठी अटक आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी स्पष्ट केल्यानंतर न्यायालयाने जामीन नाकारला. दरम्यान एकीकडे आरोपींच्या आजारपणाबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून चौकशी करण्याची मागणी तक्रारदार ओमनाथ नाटेकर यांनी केली आहे. तर दुसरीकडे पाटील बंधूंना जामीन मिळावा यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.