

Mumbai Pune Expressway Missing link project
मुंबई : मुंबई ते पुणे प्रवासातील अंतर आणि वेळ कमी करणाऱ्या मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम पूर्णत्वाला आले आहे. 1 मेपासून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा एकूण 94.5 किमी लांबीचा रस्ता आहे. द्रुतगती महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग 4 हे दोन्ही रस्ते खालापूर टोल प्लाझा येथे एकत्र येतात आणि खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात.
या भागात दरड कोसळण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच वाहतूक कोंडीही होते. त्यामुळे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्युट या भागात 13 किमीचा मिसिंग लिंक उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) करण्यात येत आहे.
मिसिंग लिंक उभारण्याचे काम 2019 साली सुरू करण्यात आले होते. अनेकदा मुदतवाढ दिल्यानंतर डिसेंबर 2025पर्यंत हे काम संपणे अपेक्षित होते. मात्र अद्याप या प्रकल्पाची काही कामे शिल्लक आहेत. यावर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हा रस्ता सुरू केला जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र अखेर आता 1 मे ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. प्रकल्पाला विलंब झाल्याने त्याचा खर्च 6 हजार 850 कोटींवरून 7 हजार 500 कोटींवर गेला आहे.
सध्या ज्या परिसरात मिसिंग लिंक उभारला जात आहे तो भाग द्रुतगती मार्गावरून पार करताना लोणावळा आणि खंडाळा घाट ओलांडावा लागतो. नागमोडी वळणांमुळे हे अंतर 19 किमी आहे. घाट पार करताना अवजड वाहनांना 40 किमी प्रतितास आणि कारला 60 किमी प्रतितास इतकी वेगमर्यादा आहे.
मिसिंग लिंकमुळे हा प्रवास 6 किमीने कमी होईल. तसेच मिसिंग लिंकवरून जाताना अवजड वाहनांना 80 किमी प्रतितास आणि कारला 100 किमी प्रतितास वेगाने प्रवास करता येईल. यामुळे वाहनचालकांचा साधारण अर्धा तास वाचणार आहे. दुचाकी आणि स्फोटक पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांना मिसिंग लिंकवर बंदी असेल.