Building Evacuation Notice
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत एकूण ५१३ धोकादायक इमारती आहेत. त्यातील १७६ इमारतींना अतिधोकादायक जाहीर करण्यात आले आहे. एकीकडे मालक आणि भाडेकरूंच्या वादातून काळाला आपसूकच निमंत्रण मिळते. तर दुसरीकडे कल्याण पूर्वेकडील चिकणीपाड्यात असलेल्या श्री सप्तश्रृंगी इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याने धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या दहा प्रभागांमध्ये या ५१३ धोकादायक इमारती आहेत. दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी केडीएमसी हद्दीतील धोकादायक इमारतींना अतिक्रमण नियंत्रण विभागाच्या माध्यमातून सुरक्षिततेचा उपाय म्हणून रिकाम्या करण्याच्या नोटिसा दिल्या जातात. या नोटिसीनंतर इमारतीचे मालक धोकादायक इमारत रिकामी करत नाही की तेथील रहिवासी केडीएमसीची नोटीस आली म्हणून घरे खाली करत नाहीत.
मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर अशा धोकादायक इमारतोंपैकी एखादी इमारत कोसळते. या दुर्घटनेनंतर केडीएमसीची काही दिवस धोकादायक इमारती पाडण्याची मोहीम सुरू होते. १७६ अतिधोकादायक इमारती आहेत. या इमारतींमध्ये रहिवास आहे. अशा इमारतींमधील रहिवासी आणि इमारतीचा मालक यांच्यात भाडे व घर रिकामे करण्यावरून वाद सुरू असतात. काही वाद न्यायप्रविष्ट असतात. या वादांपायी अनेकदा मालक इमारतीची देखभाल/दुरूस्ती करत नाहीत. रहिवाशांनी देखभाल/दुरूस्ती करण्याचा प्रयत्न केला तर त्याला मालक हरकत घेतो. वर्षानुवर्षे चालणाऱ्या या वादांमुळे इमारतीची देखभाल/दुरूस्ती करण्यात आली नाहीतर ती इमारत लवकरच धोकादायक बनते.
वादाच्या भोवऱ्यात सापडलेले रहिवासी जागेचा हक्क सोडत नाही, म्हणून इमारत धोकादायक होईल, केडीएमसीकडून तोडली जाईल किंवा पावसात कोसळेल याची वाट पाहतात. अशी इमारत एकदा कोसळली की मग इमारत मालक त्या जागेवर आपला हक्क दाखवून तेथील रहिवाशांना त्या जागेवर पाऊल ठेऊन देत नाहीत, असे प्रकार यापूर्वी कल्याण-डोंबिवलीमध्ये घडले आहेत. इमारत धोकादायक झाली तरी अशा इमारतींमधील रहिवासी घराबाहेर पडण्यास तयार होत नसल्याचे सांगण्यात येते.