डोंबिवली: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असतानाच कल्याण ग्रामीण भागात राजकारणाला हिंसक वळण लागल्याची घटना उघडकीस आली आहे. गोवेली गावचे रहिवासी असलेले शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी किरण घोरड यांची कल्याण-मुरबाड रोडला असलेल्या मामणोली गावाच्या हद्दीत अज्ञात मारेकऱ्यांकडून धारदार शस्त्रांनी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. रस्त्यात गाठून हत्या केल्यानंतर सशस्त्र हल्लेखोर त्यांच्या वाहनातून पसार झाले. एकीकडे तालुका पोलिसांनी सशस्त्र हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. तर दुसरीकडे या घटनेनंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त करून हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
किरण घोरड शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आपल्या कारमधून गोवेली गावातून बाहेर पडले. कल्याण-मुरबाड रोडला असलेल्या मामणोली गावाजवळून जात असताना पाळत ठेवलेल्या मारेकऱ्यांनी कार अडवून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला. सर्वांगावर वार झाल्याने किरण घोरड रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर तडफडत होते. चार ते पाच जणांच्या टोळक्याने किरण यांची हत्या केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या किरण यांना तात्काळ रूग्णालयात नेण्यात आले. तथापी तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
किरण यांच्यावरील हल्ल्याचे वृत्त समजताच त्यांचे समर्थक आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना मामणोली आणि गोवेली परिसरात गर्दी केली होती. या घटनेची माहिती कळताच कल्याण तालुका पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर किरण यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयाकडे पाठवून देण्यात आला.
पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर किरण घोरड यांची हत्या झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत. या हत्येला राजकीय पार्श्वभूमी आहे का ? या दिशेनेही तपास सुरू आहे.
पोलिसांनी टिटवाळा ते गोवेली, कल्याण ते मुरबाड महामार्गावरील सीसीटीव्ही फूटेज तपासून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे खास समर्थक म्हणून किरण घोरड ओळखले जात होते. या भागातील राजकीय आणि सामाजिक व कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असायचा. शिंदे गटाच्या वरिष्ठांनी किरण यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. किरण यांच्या मारेकऱ्यांना अन्यत्र पसार होण्यापूर्वीच अटक करावी, अशी मागणी मामणोली परिसरातून जोर धरत आहे. किरण घोरड हत्या प्रकरणात यापूर्वी त्यांचे कुणाशी वाद झाले होते का ? जमीन व्यवहार किंवा इतर काही व्यवसायात असताना त्यांचे व्यवहार बिघडले होते का ? अशा प्रकरणात यापूर्वी किरण घोरड यांनी किंवा अन्य कुणी तक्रारी केल्या होत्या का ? आदी प्रश्नांची उकल करण्यासाठी तालुका पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.
आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर किरण यांची हत्या झाली आहे. चौकस तपास पोलिस करत आहेत. तीन वर्षांपूर्वी मुरबाड तालुक्यातील एका कार्यकर्त्याची बारवी धरण परिसरातील भर रस्त्यात निघृण हत्या करण्यात आली होती. या हत्येला राजकीय वळण देण्यात आले होते.