सापाड : योगेश गोडे
कल्याण डोंबिवली शहराला लाभलेल्या विस्तीर्ण खाडी किनाऱ्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर कांदळवन निर्माण झाले आहे. शहराच्या तिन्ही बाजूंनी खाडी किनारा लाभलेला असून पर्यावरणीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेली हजारो हेक्टर जमीन वन कायद्यातील कलम 4 अंतर्गत राखीव वन म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. मात्र असे असतानाही गेल्या दोन दशकांपासून महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या परिसरात रेती माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मुंब्रा, दिवा, कोन, ठाकुर्ली, कोपर खाडी किनारी भागांत महाराष्ट्राबाहेरील मजुरांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर रेती उपसा सुरू आहे. खाडीची दुरवस्था रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी रेती उत्खननावर बंदी घातली असली, तरी या आदेशांना धाब्यावर बसवत कल्याण खाडीतून दररोज शेकडो ब्रास रेतीची चोरी होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सक्शन पंप, डेझर मशिन्स आणि होड्यांच्या सहाय्याने दिवसाढवळ्या तसेच रात्रीच्या अंधारात रेती उपसा केला जात आहे.
या बेकायदा उत्खननामुळे खाडी किनाऱ्यालगतची हजारो एकर सुपीक जमीन नापीक होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी स्थानिक शेतकरी आणि भूमिपुत्रांवर उपासमारीचे संकट ओढवले असून रेती माफियांवर तात्काळ कारवाईची जोरदार मागणी होत आहे. कारवाईसाठी पथक खाडी पात्रात पोहोचताच वाळू तस्कर पळ काढतात. पोलिस व प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. रेती माफियांच्या हालचाली स्थानिक पोलिसांच्या माहितीत असतानाही ‘लक्ष्मीपूजन’ झाल्यानंतर वाळूने भरलेले ट्रक मोकळेपणाने सोडले जात असल्याच्या चर्चा पालिका वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
पर्यावरणासह शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर एकीकडे रेती माफियांकडून खाडीतून बिनधास्तपणे रेती उत्खनन सुरू आहे, तर दुसरीकडे शहरीकरणाच्या नावाखाली खाड्या बुजवून आधी चाळी आणि नंतर बेकायदा इमारती उभारल्या जात आहेत. या प्रक्रियेत शेकडो हेक्टर कांदळवन नष्ट झाले असून याकडे महसूल खात्याने वेळेवर लक्ष न दिल्यास संपूर्ण परिसराचा पर्यावरणीय समतोल कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मी स्वतः अनेकदा रात्री अपरात्री खाडीत उतरून सक्शन पंप आणि होड्या पकडल्या आहेत. यावेळी माझ्यावर जीवघेणे हल्लेही झाले. महसूल मंत्री, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना लेखी तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नाही. कारवाई झाली नाही तर कल्याण खाडीचे अस्तित्वच धोक्यात येईल. सक्शन पंपांवर वेळीच कारवाई झाली नाही तर येत्या काळात कल्याण खाडीला नाल्याचे स्वरूप होईल.सागर नामदेव म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते