

बदलापूर : लहानपणापासून आजी सांगत असलेल्या गोष्टीत, पौराणिक कथांमध्ये उल्लेख असलेला चांदोबा अर्थात चंद्र चिमुकल्यांचे नेहमीच आकर्षण राहिला आहे. आता याच चंद्रभोवती चक्क चिमुकल्यांनी नावेही प्रदक्षिणा करणार आहेत. अंबरनाथ तालुक्यातील इंदगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची नावेही त्यामध्ये असून नासाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या आर्टेमिस टू मिशन या उपक्रमामुळे हे शक्य होणार आहे.
नासाच्या ऐतिहासिक आर्टेमिस 2 मिशन अंतर्गत सेंड युअर नेम टू द मून ही संकल्पना राबवण्यात आली आहे. या उपक्रमात अंबरनाथ तालुक्यातील वांगणी जवळच्या इंदगाव जिल्हा परिषद शाळेच्या 6 विद्यार्थ्यांच्या नावांची नासाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना नासाकडून डिजीटल बोर्डिंग पासही देण्यात आला आहे. या मोहिमेत काजल वाघ, समीर वाघ, रितेश कडव, वेदिका पवार, करिष्मा मुकणे आणि श्रेया कडव या सहा विद्यार्थ्यांची नावे पाठवण्यात आली आहेत.
चंद्राभोवती नासाचं यान प्रदक्षिणा घालेल त्या यानावर या विद्यार्थ्यांची नावे असतील. मुख्याध्यापक अमोल पेन्सलवार यांनी दिलेल्या माहितीनुसार ही नावे एका सूक्ष्म एसडी कार्डमध्ये संग्रहित केली जातील आणि आर्टेमिस टू अंतराळ मोहिमेद्वारे चंद्राभोवती प्रदक्षिणा करणाऱ्या यानावर पाठवण्यात येतील.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला चालना मिळेल तसेच त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन तयार होईल असा विश्वास शाळेच्या मुख्याध्यापकांनी व्यक्त केला आहे.नासाच्या या मोहिमेत विद्यार्थ्यांची नावे पाठवण्यात आल्याने एका अर्थाने या विशेष मोहिमेत आपला सहभाग असल्याची भावना निर्माण प्रयत्न विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.