

Mumbra Kalwa Railway Accident
कल्याण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (HSC) बारावीच्या परीक्षेला मंगळवार (दि. १०) पासून सुरुवात झाली. मात्र या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. परीक्षा देण्यासाठी जात असलेल्या एका विद्यार्थ्याचा लोकल रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
डोंबिवलीतील कोपर परिसरात राहणारा सोहम सचिन कठरे हा विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसला होता. सोहमचे परीक्षा केंद्र कळवा येथे असल्याने तो मंगळवारी सकाळी कोपर येथून कळव्याच्या दिशेने लोकल रेल्वेने प्रवास करत होता. मात्र, मुंब्रा आणि कळवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान धावत्या लोकलमधून तो खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळच्या वेळेत लोकलला मोठी गर्दी होती. याच गर्दीमुळे संतुलन बिघडून सोहम लोकलमधून खाली पडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोहमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेमुळे सोहमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे. बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची नोंद रेल्वे पोलिसांनी केली असून, नेमके अपघाताचे कारण काय होते याचा पुढील तपास सुरू आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळेत लोकल प्रवास करताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.