Kalyan Court Power Outage
डोंबिवली : कल्याण न्यायालयात सध्या एक विचित्र पण अत्यंत गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण न्यायालय विजेविना काम करत असल्याचे चित्र सोमवारी पहायला मिळाले. जवळपास साडेतीन हजार वकील कार्यरत असलेल्या या महत्त्वाच्या न्यायालयात तब्बल २१ न्यायदान कक्ष असूनही विजेचा पुरवठा नसल्यामुळे संपूर्ण यंत्रणाच ठप्प झाली होती. परिणामी तारखा देण्याव्यातिरिक्त कोणेतेही कामकाज करता आले नसल्याचे वृत्त आहे.
१0-१२ वर्षांपूर्वी मिळालेला जनरेटर पूर्णतः निष्क्रिय ठरला आहे. या जनरेटरमध्ये इंधन कुणी टाकायचे ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या जबाबदारीच्या अभावामुळे तो जनरेटर सडत पडला आहे. दुरूस्ती अभावी निष्क्रिय ठरलेल्या या जनरेटरच्या अभावामुळे न्यायालय अंधारात आहे. अशा परिस्थितीत पक्षकारांना न्याय कसा मिळणार ? वकिलांनी मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात आपले युक्तिवाद करायचे ? आणि न्यायाधीशांनी ते ऐकायचेही त्या अंधारातच ? हे न्यायाचे मंदिर आहे की व्यवस्थेचा उपहास ? असा सवाल उपस्थित करत कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश जगताप यांनी अशी बिकट परिस्थिती निर्माण करणाऱ्या शासन/प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत.
लोकशाहीचा स्तंभ असलेल्या न्यायपालिकेला आज लाईट मिळत नसेल तर आपण खरोखरच लोकशाहीत आहोत का ? हा केवळ वकिलांचा किंवा पक्षकारांचा नाही, तर प्रत्येक जागरूक नागरिकाचा प्रश्न आहे. तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करावा. जनरेटरला इंधन पुरवठा करणारी यंत्रणा उभी करावी.
न्यायालयासाठी स्वतंत्र इन्फ्रास्ट्रक्चर फंड निर्माण करावा. या गंभीर परिस्थितीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशा मागण्यांसह अंधारात न्याय शोधणे म्हणजे अन्यायाला संधी देणे अनिवार्य असल्याचे मत अॅड. प्रकाश जगताप यांनी व्यक्त केले आहे.