Accident News
डोंबिवली : कल्याणातील बी. के. बिर्ला शाळेचे १६ विद्यार्थी शिक्षिकांसमवेत इंडोनेशियातील बाली येथे सहलीस गेले होते. या शाळेतील एका शिक्षिकेचा तेथे अपघाती मृत्यू झाला आहे. श्वेता पुष्कर पाठक असे अपघातात मरण पावलेल्या शिक्षिकेचे नाव आहे. या शिक्षिकेच्या मृत्यूची खबर कळताच विद्यार्थ्यांसह पालक वर्गात हळहळ व्यक्त होत आहे. सोमवारी या महिला शिक्षिकेचे पार्थिव कल्याणला आणले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
बी. के. बिर्ला शाळेने इंडोनेशिया देशाचा प्रांत असलेल्या बाली या छोट्या आणि सुंदर बेटावर वसलेलेल्या ठिकाणी पर्यटन कंपनीच्या माध्यमातून सहलीचे नियोजन केले होते. या सहली सोबत बी. के. बिला शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना जांग्रा आणि इतर शिक्षक, तसेच श्वेता पाठक यांचे पतीही होते. शनिवार रात्री शाळेतील एका शिक्षिकेचा बाली येथे मृत्यू झाल्याची खबर कल्याणमध्ये येऊन आदळताच एकच खळबळ उडाली.
या घटनेबद्दल सुरूवातीला स्थानिक पोलिसांसह शिक्षण संस्था देखील अनभिज्ञ होती. तथापी रात्री उशिरा श्वेता पाठक यांचा इंडोनेशियातील बाली येथे अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनेला दुजोरा मिळाला. श्वेता पाठक यांच्या अपघाती निधनामुळे शाळा व्यवस्थापन, पालक आणि विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे. परदेशात शालेय सहली नेताना सीबीएससी शाळेची नियमावली आहे. या नियमावलीप्रमाणे विदेशात पर्यटनासाठी विद्यार्थ्यांना घेऊन जाताना त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात यावे.
स्थानिक जिल्हा प्रशासनासह स्थानिक यंत्रणेला यासंदर्भात अवगत करणे आवश्यक असते. या नियमावलीचे सहल आयोजित करणाऱ्या शाळा प्रशासनाने पालन केले किंवा कसे याबद्दल अधिकृत माहिती समजू शकली नाही. शाळा व्यवस्थापनाकडून या संदर्भात प्रतिसाद मिळाला नाही. पर्यटन कंपनीच्या सहाय्याने शाळेचे विद्यार्थी शिक्षकांबरोबर बाली येथे गेले. तेथे एका शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची माहिती शाळेच्या संकेतस्थळावर देण्यात आली. सद्या इतकीच माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
बी. के. बिर्ला शाळेतील हरहु्न्नरी स्वभावाच्या आदर्श शिक्षिका म्हणून श्वेता पाठक ओळखल्या जात होत्या. उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्यांची शाळेत वेगळी ओळख होती. शालेय अभ्यासक्रमासह विद्यार्थ्यांना अवांतर माहिती देऊन त्यांची घडण झाली पाहिजे यासाठी श्वेता पाठक यांचे प्रयत्न असत. विद्यार्थी आणि पालकांतील महत्वाचा दुवा म्हणून त्या कार्यरत असत. उत्तम प्रशिक्षक म्हणून देखिल त्यांची ओळख होती. प्रत्येक विद्यार्थी आपल्या क्षमतेप्रमाणे विकसित व्हायला हवा, यासाठी त्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम हाती घेत असत असे शाळेतील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.