

भारतीय लष्करात हरियाणातील अंबाला या ठिकाणी नायक पदावर कार्यरत असणारे भोसलेवाडी (ता. पुरंदर) येथील जवान अविनाश हरिश्चंद्र भोसले (वय 32) यांचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाला. बुधवारी (दि. 23) त्यांच्यावर मूळगावी भोसलेवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अविनाश भोसले हे सैन्यदलातील कामानिमित्त पुणे येथे आले होते. पुण्यातील काम आटोपून गावी कुटुंबीयांना भेटून पुन्हा हरियाणा येथे निघाले होते. अंबाला येथे जात असताना गुजरातमधील वापी येथे धावत्या रेल्वेतून पडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भोसलेवाडीसह तालुक्यात शोककळा पसरली आहे.
शेतकरी कुटुंबात जन्मलेले अविनाश हे एकुलते एक होते. त्यांना लहानपणापासूनच लष्करात भरती होण्याची इच्छा होती. 2011-12साली ते लष्करात दाखल झाले होते. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे कुटुंबात आणि पंचक्रोशीत ते लाडके होते. गावातील सामाजिक कामात ते अग्रेसर होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, 4 वर्षांची मुलगी आणि एक बहीण असा परिवार आहे.
अंत्यसंस्कारावेळी हरियाणा येथील लष्करातील अधिकारी आणि जेजुरी पोलिसांच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. या वेळी आमदर संजय जगताप, माजी मंत्री विजय शिवतारे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, जेजुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.