Station Master Attack Pudhari
ठाणे

Station Master Attack: लोकल उशिराने धावण्‍याचा राग स्टेशन मास्तरांवर! रेल्वे कर्मचाऱ्यांचा कल्याणमध्ये एल्गार, काम बंद आंदोलनाचा इशारा

शेकडो स्टेशन मास्तरांचे कल्याण स्थानकात शक्तिप्रदर्शन; हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी, अन्यथा काम बंद आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

योगेश गोडे

कल्याण: लोकल उशिरा धावली की प्रवाशांचा संताप थेट स्टेशन मास्तरांवर! कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांवरील स्टेशन मास्तरांच्या कार्यालयांत घुसून मारहाण केल्याच्या घटनांनी रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या हल्ल्यांविरोधात शेकडो स्टेशन मास्तरांनी कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एकत्र येत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

हल्लेखोरांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करा, अन्यथा काम बंद आंदोलन छेडू, असा थेट इशारा स्टेशन मास्तर असोसिएशनने दिला आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर लोकल विलंबाने धावणे, गर्दी आणि वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो.

मात्र, या विलंबाचा जाब विचारताना कर्तव्यावर असलेल्या स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात घुसून मारहाण करण्याचे प्रकार घडत असल्याने संताप व्यक्त होत आहे. गेल्या आठ दिवसांत कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर येथे अशा घटना घडल्याचा दावा संघटनेने केला आहे.

रेल्वे वाहतुकीचे नियोजन, गाड्यांच्या सुरक्षित हालचाली आणि विविध विभागांशी समन्वय राखण्याची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच मारहाणीला सामोरे जावे लागत असेल, तर त्यांनी काम कसे करायचे, असा सवाल उपस्थित होत आहे.

या घटनांच्या निषेधार्थ स्टेशन मास्तर असोसिएशनच्या नेतृत्वाखाली शेकडो स्टेशन मास्तर आणि पदाधिकारी कल्याण रेल्वे स्थानक परिसरात जमले. रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) आणि लोहमार्ग पोलिसांच्या (जीआरपी) कार्यालय परिसरात घोषणाबाजी करून त्यांनी हल्लेखोरांविरोधात कारवाईची मागणी केली.

केवळ निषेध व्यक्त करून चालणार नाही, तर संबंधितांना तातडीने अटक करून कायद्याचा धाक निर्माण करावा, अशी आक्रमक भूमिका संघटनेने घेतली.

कार्यालयात घुसून मारहाणीचे आरोप

लोकल विलंबामागे सिग्नल यंत्रणेतील बिघाड, तांत्रिक समस्या, रेल्वे मार्गावरील अडचणी किंवा अन्य परिचालनविषयक कारणे असू शकतात. या समस्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होत असली, तरी त्यासाठी एखाद्या कर्मचाऱ्याला लक्ष्य करणे हा उपाय नाही.

प्रवाशांना तक्रार नोंदविण्यासाठी अधिकृत यंत्रणा उपलब्ध असताना कायदा हातात घेण्याच्या प्रकारांना आळा घालणे आवश्यक आहे. स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात घुसून मारहाण होत असेल, तर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक सुरक्षेसोबतच रेल्वेच्या सुरक्षित कामकाजाचाही प्रश्न निर्माण होतो.

हल्लेखोरांना अटक करा

आता स्टेशन मास्तर असोसिएशनने दिलेल्या काम बंद आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे रेल्वे प्रशासनासह आरपीएफ आणि जीआरपीसमोर कारवाईचे आव्हान उभे राहिले आहे.

‘कारवाई करा, अन्यथा काम बंद!’

लोकल उशिराने धावल्याचा राग प्रत्येक वेळी स्थानकावर कर्तव्य बजावणाऱ्या स्टेशन मास्तरांवर काढला जातो. गेल्या आठ दिवसांत कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर येथील स्टेशन मास्तरांच्या कार्यालयांत घुसून मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत.

मात्र, मारहाण करणाऱ्यांविरोधात आरपीएफ आणि जीआरपी ठोस कारवाई कधी करणार? संबंधितांना तातडीने अटक करून कायदेशीर शासन झाले नाही, तर आम्ही काम बंद करू, असा इशारा स्टेशन मास्तर असोसिएशनचे कुमार कुंदन यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT