Water Pipeline Burst Pudhari
ठाणे

Water Pipeline Burst: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील रायते पुलाजवळ जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया

या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पाण्याचे उंच फवारे आणि रस्त्यावरून वाहणारा पाण्याचा प्रवाह दिसत आहे. वाहतुकीलाही काही काळ अडथळा निर्माण झाला होता.

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर असलेल्या रायते पुलाजवळ मंगळवारी सायंकाळच्या सुमारास महत्त्वाची जलवाहिनी फुटल्याची घटना घडली. पाईप फुटताच प्रचंड दाबाने पाणी हवेत उडाले आणि परिसरात पाणीच पाणी झाले. यामुळे लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया गेल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पाण्याचे उंच फवारे आणि रस्त्यावरून वाहणारा पाण्याचा प्रवाह दिसत आहे. वाहतुकीलाही काही काळ अडथळा निर्माण झाला होता. पाईपलाईन फुटल्यानंतर त्यातून निघणाऱ्या पाण्यामुळे परिसराला नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.

या जलवाहिनीतून कल्याण ग्रामीण आणि परिसरातील काही भागांना पाणीपुरवठा होतो. त्यामुळे फुटीनंतर संबंधित भागात पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. एमआयडीसी आणि संबंधित यंत्रणेच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन दुरूस्तीचे काम हाती घेतले. तथापी पाईपमधील पाण्याचा दाब कमी झाल्यानंतरच दुरूस्तीला सुरुवात होऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्या पावसाळ्यानंतरही अनेक भागात पाणीटंचाई आहे. अशातच लाखो लिटर पाणी वाया गेल्याने स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. टँकरसाठी पैसे मोजावे लागतात आणि इकडे पाणी असेच वाया जात असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली. तथापी दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरच या भागाचा पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT