ठाणे : कळवा रेल्वे स्थानक ते कळवा पश्चिम भागात पोहोचण्यासाठी रेल्वे प्रशासनाद्वारे पादचारी पूल बऱ्याच वर्षांनंतर उभारण्यात आला आहे. या पुलाच्या कामाला वेग आला असून येत्या 2 महिन्यांत या पुलाचे काम पूर्ण होऊन तो कळव्यातील प्रवाश्यांच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती ठाणे रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली आहे.
काही स्थानिक नागरिक व प्रवाश्यांनी या पूल उभारणी संबंधीत मागणी केली होती. रेल्वे प्रशासनाने 2024, पासून पूल बांधणीसाठी निर्देश केले होते; परंतु काही कारणांनी या पुलाच्या बांधणीला काही काळासाठी थांबा देण्यात आला होता. मात्र रेल्वे प्रशासनाने पुलाच्या प्रश्नाला गांभीर्याने घेत अन्य कंत्राटदाराला पुलाचे कंत्राट देऊन अवघ्या एका वर्षात रेल्वेचे पूल 75% यशस्वीरीत्या उभारले.
कळवा ग्रामस्थ व रेल्वेने दरदिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे कळवा पूर्वी आणि पश्चिम परीसराला जोडण्यासाठी पुलाच्या उभारणीची मागणी केली होती. रेल्वे प्रशासनाने मागणीकडे लक्ष्य देत काही वर्षांनी पूल बांधण्यासाठी प्रस्ताव मंजूर करून तत्काळ बांधकाम सुरू केले. कळवा पश्चिम पुलाप्रमाणे कळवा पूर्व भागात देखील पूल उभारण्यात यावा, अशी मागणी ठाणे रेल्वे प्रवाशी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
कळवा पूर्व भागातील प्रवाश्यांना बऱ्याचवेळा रेल्वे स्टेशनवर पोहचण्यासाठी इतर पर्यायी मार्ग निवडून स्टेशनवर पोहचावे लागते. रेल्वे प्रशासनातर्फे कळवा पश्चिम भागात पूल उभारण्यात आले. त्याचप्रमाणे कळवा पूर्व भागातून रेल्वे स्टेशनवर पोहोचण्यासाठी पूल उभारावे, अशी मागणी कळवा पूर्व भागातील नागरिकांची आहे.