

कसारा : दारूच्या नशेत टेंभूर्ली येथील एका तरुणाने विहिरीत उडी मारून जीवन संपवल्याची घटना घडली आहे. जीवन संपवल्याचा ठपका पोलिसांवर ठेवत गावकऱ्यांनी कठोर भूमिका घेत जोपर्यंत दारू विक्रेत्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत विहिरीतून मृतदेह काढून देणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याने किन्हवली पोलिसांच्या नाकीनऊ आले होते. शेवटी दारू विक्रेत्यांवर कारवाईला सुरुवात केली व गावकऱ्यांना विनंती केल्यानंतर मृतदेह विहिरीतून बाहेर काढला व मृतदेह शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.
शहापूर तालुक्यातील टेंभूर्ली गावातील कातकरी वाडीतील देवराम रामू रन यांनी दारू विक्रेत्याकडून मंगळवारी दुपारी 1 च्या सुमारास दारू पिऊन दारूच्या नशेत गावातील विहीरीत उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली. याची माहिती किन्हवली पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विहीरीतून मृतदेह काढण्याचा प्रयत्न करत असताना गावकऱ्यांनी मृतदेह काढण्यास तीव्र विरोध केला.
जोपर्यंत दारू विक्रेत्यावर कारवाई करत नाही, तोपर्यंत मृतदेह विहिरीतून काढून दिले जाणार नाही, अशी भूमिका घेतल्याने किन्हवली पोलिसांच्या नाकीनऊ आले. अखेर टेंभूर्ली पाड्यात चोरून लपून दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर कारवाईला सुरुवात केल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना मदत करत विहीरीतून मृतदेह बाहेर काढू दिला. पोलिसांनी देवराम रन याचा मृतदेह शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास किन्हवली पोलीस करीत आहेत.