नवी मुंबईतील कळंबोली येथे आपल्या उदरनिर्वाहसाठी एकवटलेल्या सप्तशृंगी मातेच्या भक्तांनी वणी गडावरील सप्तशृंगी मातेचे सुबक मनमोहक असे लोक वर्गणीतून दिमाखदार मंदिर साकारण्यात आले आहे.
या मंदिरातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रमाची रेलचेल ही पाहायला मिळते. समाजप्रबोधन समाज उपयोगी विविध उपक्रम आयोजित करून सप्तशृंगी माता मंदिर ट्रस्टने एक आगळावेगळा समाजसेवेचा आदर्श घालून दिलेला आहे.
नवरात्र उत्सवामध्ये विविध सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे वैविध्य पूर्ण आयोजन करून भक्तांना एक प्रकारे मातेचा आशीर्वादच मिळत असतो. या नवरात्राच्या कालावधीत नवी मुंबई मधील खान्देशातील मातेचे भक्तगण तसेच राज्यातील विविध प्रांतातील सर्व जाती धर्माचे भक्तगण आवर्जून कळंबोलीतील मंदिरात उपस्थिती दर्शवून वणीच्या सप्तशृंगी मातेबद्दल असलेली अंतकरणातील निस्सीम भक्ती दर्शवून देतात.
कळंबोली वसाहतीची निर्मिती ज्यावेळेस केली गेली त्यावेळी राज्यातील तसेच देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून आपलं उदरभरण करण्यासाठी कळंबोली वसाहतीमध्ये लाखो नागरिक येऊन कायमचेच कळंबोलीचे रहिवासी झाले. राज्यातील खानदेश हा शेती पूरक परिपूर्ण असलेला प्रदेश.
येथून कळंबोली तसेच नवी मुंबईमध्ये लाखो खान्देश वासिय आपले नशीब आजमावायला येऊन राहिले. खानदेश वासियांची वनी गडावरील सप्तशृंगी माता हे देवस्थान हृदय स्थानी असलेल अन कायम आशीर्वाद देणारी माता आहे.
सर्व बंधू भगिनींना एकत्रित करावे व विविध कार्यक्रमाचे आयोजन करून खानदेशामधील विविध पारंपरिक कला, परंपरा, धार्मिक उत्सव, सण, पाककला व विविध उपक्रमातून सर्व समाज बांधवांचे स्नेहसंमेलन व्हावे या उद्देशाने सप्तशृंगी माता मंदिर ट्रस्टची निर्मिती ही गंगाधर मानकू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2000 मध्ये करण्यात आली.
त्यावेळी मातेचे छोटेसे मंदिर बांधून त्याद्वारे नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसाच्या धार्मिक कार्यक्रम एक आगळ्यावेगळ्या उत्सवाप्रमाणे केला जायचा. त्यावेळीही नवी मुंबई तसेच ठाणे मुंबई मधील हजारो भावीक हे कळंबोली मध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या कालावधीत येऊन मातेच्या चरणी नतमस्तक होत असत. त्यानंतर मातेच्या भक्त गणाची व्याप्ती ही वाढत गेली व मंदिर ट्रस्टने मातेचे मंदिर हे भव्य दिव्य दिमाखदार कला कुसराने परिपूर्ण असावे असा निर्णय घेण्यात आला.
2024 मध्ये कळंबोलीतील सप्तशृंगी मातेचे मंदिर लोक सहभागातून व मातेच्या भक्तांच्या वर्गणीतून उभारण्यात आले. मंदिर उभारणीमध्ये पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर व देवीचे एक भक्त दीपा आनंद बिट्टू यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. मातेची मूर्ती ही मनमोहक सुंदर आणि भक्तांना कायम आशीर्वाद देणाऱ्या पूर्वाभिमुख रचनेची आहे.या मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून नवरात्र उत्सवात तर विविध कार्यक्रमाची रेलचेल असतेच.
मंदिर ट्रस्टच्या वतीने चैत्र पौर्णिमेचे महत्त्व हे आगळे वेगळे आहे या दिवशी रात्री ठीक बारा वाजता मंदिरावरील कळसा वरील भगवा ध्वज हा मानपान देऊन उतरवला जातो आणि त्याच वेळेला नवीन भगवी पताका मंदिराच्या कलशा वरती फडकवली जाते. हा धार्मिक कार्यक्रम गेल्या पंचवीस वर्षापासून अव्याहतपणे यथा सांग पार पाडला जात आहे.
या मंदिर ट्रस्ट हे धर्मादाय आयुक्त कडे नोंदणीकृत झाले असून मंदिराचा कारभार हा स्वच्छ पारदर्शक आणि शासनाच्या नीती नियमानुसार सुरू करण्याची मोलाची जबाबदारी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गंगाधर मानकू पाटील हे सांभाळीत आहेत.
तर सचिव पदाची जबाबदारी शंकर दगडे यांच्यावर असून सहसचिव म्हणून दामोदर म्हात्रे हे मंदिर ट्रस्टचे काम पाहत आहेत. उपाध्यक्ष म्हणून दगडू पाटील तर सतीश पाटील, सुरेश सोनवणे, जगन पाटील, जयश्री जमादार, पंढरीनाथ ठाकूर हे मंदिर ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम पाहत आहेत.
सप्तशृंगी माता ट्रस्ट कडून मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमाबरोबरच मोफत रक्तदान शिबिर, रक्त तपासणी शिबिर, आरोग्य तपासणी, डोळ्यांचे विविध आजार असतील तर त्याची तपासणी, मोफत तसेच माफक दरात चष्मे वाटप, मातीचे किल्ले बनवणे, चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करून एक आगळावेगळा आदर्श समाजापुढे या ट्रस्टने निर्माण केलेला आहे.