ठाणे: ठाणे महानगर पालिका आणि वनखाते यांच्या माध्यमातून डी डायाभाई अँड कंपनीने २८०० कोटीचा टीडीआर घोटाळा केला आहेच. मात्र, ९४ एकरचा सुमारे ४ हजार कोटींचा घोटाळा लपविण्याचा खरा डाव टीडीआरमागे असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील १९४ एकर पैकी ९४ एकरवर तरूणाईला बिघडवणारे सर्व धंदे सुरू असून त्यातून भाडे घेऊन कोठारी- डी डायाभाई गब्बर होत आहे. हे भूखंड विकून त्यातून मालामाल होण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला. दरम्यान, या कोठारी कंपाऊंडमध्ये आम्ही घुसून सर्व सरळ करू; बघतो मग कोणते गुंड अंगावर येतात ते, असा इशाराही डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी दिला.
येऊरच्या पायथ्याशी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून, चितळसर-मानपाड्यातील १९४ एकर वनजमीन ठाणे पालिकेच्या विकास आराखड्यामध्ये बायोडायव्हर्सिटी म्हणजेच जैविक पार्क म्हणून आरक्षित आहे. हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे.
तरीही आज २,८०० कोटींचा टीडीआर देण्याची प्रक्रिया ठामपाने सुरू केली आहे. मात्र, ९४ एकरचा घोटाळा लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा पर्दाफाश डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
आव्हाड म्हणाले की, डी. डायाभाई अँड कंपनीला टीडीआर देऊ नये, असे पत्र वनसंरक्षक व संचालक अनिता पाटील यांनी १९ जून २०२६ रोजी दिले आहे. तसेच, विशेष अनुमती याचिका दाखल करण्याचेही कळविले आहे. मग, गेले ९६ दिवस हे वनखाते झोपले होते का? डायाभाई हे दरोडेखोर आहे. टीडीआर हे बहाणा आहे.
पण, त्याने ९४ एकरवर दरोडा घातला आहे. १०० एकर जमीन निवासी क्षेत्रात परावर्तित करून घेतली आहे. येथील जमिनीचा दर साधारणपणे एकरामागे ४० कोटीचा आहे. म्हणजेच अंदाजे ४ हजार कोटींची सरळसरळ लूट आहे. या डायाभाई- कोठारीने या भागात गोदामे, पब्ज, वेश्यालये बांधून त्याचे भाडे वर्षानुवर्ष खाल्ले आहे, हे ठाणे पालिकेला दिसत नाही का? आता या ९४ एकरसाठी कोणकोणते बिल्डर गळाला लागले आहेत, याचीही माहिती आपणाकडे आहे.
म्हणूनच या ९४ एकरचाही हिशोब लागला पाहिजे. जर पारदर्शकता दाखवायचीच असेल तर सर्व १९४ एकरवर उद्यान करा ना! हा दरोडा आहे. या कोठारी कंपाऊंडवर अधिवेशन संपण्याआधी कारवाई केली नाही तर आम्ही तिथे घुसू. मग, कोण आडवे येतात तेही आम्ही बघून घेऊ.