भररस्त्यात ३० मीटर उंचीवरून लोखंडी अँगल कोसळला pudhari photo
ठाणे

Thane Accident : भररस्त्यात ३० मीटर उंचीवरून लोखंडी अँगल कोसळला

गोल्डन नेस्ट परिसरात मेट्रोचा निष्काळजीपणा : एकजण जखमी

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड : मिरा-भाईंदरमधील मेट्रो मार्गिका क्रमांक ९ च्या कामातील हलगर्जीपणाचा आणखी एक धक्कादायक नमुना समोर आला आहे. भाईंदर पूर्वेतील गोल्डन नेस्ट परिसरातील मेडतिया नगर मेट्रो स्थानकाच्या बांधकामादरम्यान तब्बल २५ ते ३० मीटर उंचीवरून लोखंडी अँगल थेट रस्त्यावर कोसळून एका नागरिकाला गंभीर दुखापत झाली. हेल्मेटमुळे त्यांचा जीव वाचल्याने मोठी दुर्घटना टळली, मात्र या घटनेने मेट्रो प्रशासन आणि कंत्राटदाराच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

सर्वोदय कॉम्प्लेक्सचे सचिव संजय मकवाना हे घटनास्थळावरून जात असताना अचानक दोन फूट लांबीचा लोखंडी अँगल त्यांच्या अंगावर कोसळला. अँगलचा जोरदार फटका त्यांच्या उजव्या हाताला बसल्याने हात फ्रॅक्चर झाला. सध्या त्यांच्यावर भाईंदर येथील बालाजी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अँगल थेट हेल्मेटवर आदळल्याने त्यांचा जीव वाचला. अन्यथा ही घटना जीवघेणी ठरली असती, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली. या प्रकरणी अधिकारी व कंत्राटदारावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी होतेय.

हेल्मेट नसते तर मृत्यू अटळ!

२५ ते ३० मीटर उंचीवरून कोसळलेला लोखंडी अँगल थेट संजय मकवाना यांच्या हेल्मेटवर आदळला. हेल्मेटने धक्का झेलल्याने जीव वाचला; मात्र हाताला गंभीर दुखापत झाली. या घटनेने बांधकामस्थळी सुरक्षेच्या उपाययोजनांचा फज्जा उडाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

अपघात वाढता वाढे, कंत्राटदार बेफिकीर

डिसेंबर २०२४ मध्ये काशिमिरा येथे आरएमसी मिक्सर खड्ड्यात कोसळून चालकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मेट्रो पिलरवरून ३० किलो वजनाचा हायड्रॉलिक जॅक खाली पडल्याची घटनाही घडली होती. त्या वेळी एमएमआरडीएने कंत्राटदार कंपनीला १० लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र, वारंवार घडणाऱ्या घटनांवरून सुरक्षेबाबत कोणतेही धडे घेतले नसल्याचे स्पष्ट होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT