Kolhapur Accident | उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, 10 हजार लिटर तेल रस्त्‍यावर सांडल्याने खळबळ!

सांगली-कोल्हापूर महामार्गावर चार तास वाहतूक कोंडी, लाखो रुपयांचे नुकसान
Kolhapur News
उदगाव येथे सांगली कोल्हापूर बायपास महामार्गावर उलटलेला टँकर क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यात आला.
Published on
Updated on

जयसिंगपूर: सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव (ता. शिरोळ) येथील बायपासवर मंगळवारी दुपारी तीन वाजता पेट्रोल वाहतूक करणारा टँकर उलटल्याची भीषण घटना घडली. हॉटेल सिग्नेचरजवळ पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर अचानक उलटल्याने सुमारे १० हजार लिटर पेट्रोल रस्त्यावर सांडले. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास मिरज येथून हा टँकर कोल्हापूरच्या दिशेने जात असताना ओव्हरटेक अनियंत्रित होऊन बायपासवर उलटला. टँकर उलटताच त्यातील पेट्रोल वेगाने रस्त्यावर वाहू लागले. पेट्रोल ज्वालाग्राही असल्याने मोठा अनर्थ टाळण्यासाठी जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने धाव घेत सांगली-कोल्हापूर बायपासवरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे रोखून धरली.

बायपासवरील वाहतूक बंद केल्यामुळे सर्व वाहने जयसिंगपूर शहरातून उदगावमार्गे वळवण्यात आली. याचा थेट परिणाम जयसिंगपूर-उदगाव मुख्य मार्गावर झाला. अवजड वाहनांच्या रांगा लागल्याने दुपारी 3 पासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत तब्बल तीन ते चार तास या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते जेणेकरून कोणत्याही प्रकारचा आगीचा धोका उद्भवणार नाही. सांडलेल्या पेट्रोलमुळे परिसरात उग्र वास पसरला होता.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात इंधनाची नासाडी झाल्याने ऑईल कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत क्रेनच्या साहाय्याने टँकर बाजूला काढण्याचे व रस्ता स्वच्छ करण्याचे काम सुरू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news