ठाणे : भारताची जवळजवळ 44 जहाजे आखातातील युद्धामुळे अडकलेली असून त्याचा परिणाम शेतीमाल अडकण्यावर झाला आहे. त्यामुळे शेतीवर एक नवे संकट आले आहे. एका बाजूला उष्णतेच्या लाटेमुळे फळपिकांवर परिणाम होत असताना जहाजांवरून परदेशात जाणारी द्राक्षे, केळी, आंबा हे वाटेत अडकले आहेत.
मध्यपूर्वेतील भू-राजकीय अस्थिरतेमुळे अडकून पडलेल्या निर्यातदारांना जवाहरलाल नेहरू पत्तन प्राधिकरणाने मोठा दिलासा दिला आहे. बंदरात अडकलेल्या कंटेनर्सवरील साठवणूक शुल्क व रिफर प्लग-इन शुल्कामध्ये मोठी सवलत देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र अडकलेल्या मालाचे काय, यावर अद्याप उत्तर मिळालेले नाही.
केंद्र सरकारच्या बंदर, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जेएनपीएने ही सवलत जाहीर केली आहे. यामध्ये प्रामुख्याने दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. ग्राउंड रेंटमध्ये 100% सवलत : 28 फेब्रुवारीपासून बंदरात असलेल्या किंवा 8 मार्चच्या सकाळी 7 वाजेपर्यंत गेट-इन झालेल्या कंटेनर्सना 15 दिवसांपर्यंतच्या ग्राउंड रेंट किंवा ड्वेल टाइम चार्जेसमध्ये 100% माफी देण्यात आली आहे. रिफर शुल्कात 80% माफी : नाशवंत वस्तू असलेल्या रिफर कंटेनर्सना 15 दिवसांच्या कालावधी- साठी प्लग-इन शुल्कामध्ये 80 टक्के सवलतीची घोषणा झाली आहे.
जेएनपीएने स्पष्ट केले आहे, शिपिंग लाईन्स, फ्रेट फॉरवर्डर्स, एनव्हीओसीसी यांनी ही सवलत प्रत्यक्ष निर्यातदारांपर्यंत पोहोचवणे बंधनकारक आहे. जेणेकरून भू-राजकीय परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या व्यापाऱ्यांना आधार मिळेल अशी माहिती जेएनपीएचे मुख्य महाव्यवस्थापक गिरीश थॉमस यांनी दिली आहे.
पालघर शहर : घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखा पालघरने जेरबंद केले आहे. अटक आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. रोहित कान्हुभाई सोलंकी उर्फ रोहित शेट्टी (वय 25) असे अटक आरोपीचे नाव आहे. पालघर शहरातील कमलापार्क येथील रहिवासी सुचितकुमार वैकुंठ वर्मा यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने 1,94,500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी विशेष पथके तयार करून रोहित सोलंकी याला ताब्यात घेण्यात आले आहे.