शहापूरात वनक्षेत्रात गावठी दारूच्या भट्ट्यांची चलती  pudhari photo
ठाणे

Thane Crime : शहापूरात वनक्षेत्रात गावठी दारूच्या भट्ट्यांची चलती

भट्ट्यांसाठी लागणारे सरपणही वनाच्याच जंगलातून, वन कायदा बसविला धाब्यावर

पुढारी वृत्तसेवा

किन्हवली : शहापूर तालुक्यातील कसारा परिसरात उंब्रावणे कंपार्टमेंटमधील राखीव क्षेत्रात सुमारे 200 ते 250 गावठी दारूच्या भट्ट्या सुरु असल्याची गंभीर बाब समोर येत असून या दारुभट्ट्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जागृत नागरिक हरेश हरड यांनी केली आहे. दरम्यान, संबंधित बाब उघड होताच वनाच्या जागेतील या दारूभट्ट्या इतरत्र हलवण्याची धावाधाव सुरु असल्याचा आरोप हरड यांनी केला आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर वनविभागाच्या वनपरिक्षेत्र विहिगाव अंतर्गत कसारा परिमंडळाकडील नियतक्षेत्र उंब्रावणे कंपार्टमेंट नंबर 637, 638, 647 व नियतक्षेत्र दांड कंपार्टमेंट नंबर 646 मधील क्षेत्रात जवळपास 200 ते 250 अवैध दारूभट्टया चालवण्यात येत आहेत, अशी लेखी तक्रार मुख्य वनसंरक्षक ठाणे यांच्याकडे करण्यात आली आहे. वनक्षेत्रातील या दारूभट्ट्या कुणाच्या आशीर्वादाने राजरोसपणे सुरू आहेत? असा सवाल करत जागृत नागरिक हरेश हरड यांनी या गंभीर विषयात तात्काळ लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मुख्य वनसंरक्षक ठाणे यांच्याकडे केली आहे.

हरड यांनी आपल्या तक्रारी अर्जात वनविभागाच्या भ्रष्ट कारभारावर बोट ठेवत अनेक गंभीर बाबी उघड केल्या आहेत. सदर वनक्षेत्रात दारूभट्ट्या वन कर्मचारी व अधिकारी यांच्याच आशीर्वादाने सुरु असून भट्ट्यांसाठी लागणारे सरपणही वनाच्याच जंगलातून वापरले जात आहे. त्याबदल्यात दरमहा हप्ता घेतला जात असून वनाच्या जागेतील हॉटेल चालकांशीही अर्थपूर्ण व्यवहार होत असल्याचे हरड यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वनविभागात सुरु असलेल्या या अवैध धंद्यांना कुणाचे पाठबळ आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सदर तक्रार दाखल करताच संबंधित वनक्षेत्रातील या दारू भट्ट्या इतरत्र हलवण्याची धावपळ सुरु झाली असल्याची माहिती तक्रारदार हरेश हरड यांनी दिली आहे.

याच दारुभट्ट्यांच्या आड नियतक्षेत्र उंब्रावणे कंपार्टमेंट नंबर 637, 638 व 647 येथील राखीव व संरक्षित वनक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात खैर व सागाची तस्करी होत असल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी कसारा आरएफओ संदीप तोरडमळ यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच संबंधित वनपालांचा मोबाईलही बंद असल्याचे निदर्शनास आले.

2 फेब्रुवारी रोजी सीसीएफ ठाणे यांना तक्रार अर्ज देऊन तात्काळ कारवाई करण्याबाबत विनंती केली होती.त्यानुसार परिमंडळ कसारामधील वनपाल व इतर स्टाफ राऊंडमध्ये जाऊन दारू भट्ट्या तोडण्याचे काम सुरु झाल्याचे मला परिसरातून समजले आहे. मात्र याप्रकरणी दोषी वन अधिकारी व कर्मचारी यांच्यावर शिस्तभंग व फौजदारी कारवाई व्हावी, अशी माझी मागणी आहे.
हरेश हरड, तक्रारदार
सदर प्रकरणी आम्ही तात्काळ गस्त पथकाची नेमणूक केली असून तक्रारीची सखोल चौकशी केली जाईल.
प्रवीण एन.आर., मुख्य वनसंरक्षक ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT