भिवंडीत गावठी दारूचा अवैध साठा जप्त pudhari photo
ठाणे

Bhiwandi illegal liquor : भिवंडीत गावठी दारूचा अवैध साठा जप्त

लाखो रुपयांचे हातभट्ट्यांचे अड्डे उध्वस्त

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी ः पुणे येथील पिंपरी-चिंचवड येथे हातभट्टीच्या विषारी दारू प्राशन करून झालेल्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेकायदेशीर सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुषंगाने भिवंडीतील राज्य उत्पादन शुल्क विभागीय कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी आपल्यावर कारवाई होईल या भितीने खडबडून जागे झाले असुन त्यांनी भिवंडीतील ग्रामीण भागात राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई करीत लाखो रुपयांचे हातभट्ट्यांचे अड्डे उध्वस्त केले.

मात्र मुख्य आरोपी न सापडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असुन या कारवाई संदर्भात सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची चर्चा ग्रामीण भागात सुरू झाली आहे.भिवंडीच्या ग्रामीण भागात खाडीच्या किनारी असलेले कालवार, केवणी, खर्डी, वडूनवघर, आलीमघर या गावात मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षापासून गावठी दारू विक्री होत असते त्यामुळे पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी अधुनमधून वरिष्ठांना दाखविण्यासाठी कारवाई करतच असतात. परंतु पुणे येथील पिंपरी-चिंचवड येथे हातभट्टीच्या विषारी दारूकांड घडल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संतप्त झाले असुन त्यांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले असून त्यांनी भिवंडी तालुक्यातील वरिष्ठ गावात सुरू असलेले हातभट्टीची दारू बनविणारे अड्डे उध्वस्त केले. तसेच इतर सर्व ठिकाणी केलेल्या कारवाईत 29 गुन्हे दाखल केले असून त्यापैकी 19 आरोपींवर प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली. इतर 10 ठिकाणी घटनास्थळी आरोपी सापडले नाहीत. या कारवाईत 225 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. तर इतर ठिकाणचे हातभट्टीची दारू बनविणारे अड्डे कर्मचाऱ्यांनी उध्वस्त केले. तसेच देशी,विदेशी मद्य, 23 हजार 200 लिटर रसायन आणि 1 वाहन असा एकूण 10 लाख 36 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदर कारवाई 1 मे ते 31 मे दरम्यान करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क,भिवंडी विभागीय कार्यालयाकडून देण्यात आली आहे.राज्य उत्पादन शुल्क कोकण विभाग व ठाणे यांच्या आदेशान्वये भिवंडी विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.यामध्ये 60 हजार लिटर रसायन आणि 2 हजार लिटर गावठी दारूसह एक वाहन असा एकूण 23 लाखांचा जप्त करण्यात आले असून खाडीलगत झालेल्या या कारवाईमुळे अवैधपणे हातभट्टी चालवणाऱ्या मालकांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT