Cliffside Bambootail Pudhari
ठाणे

Cliffside Bambootail: रानफुलांच्या बहरात अवतरली दुर्मीळ ‘हिरकणी टाचणी’

हरिश्चंद्रगडाच्या डोंगररांगांत स्वच्छ झरे, गारवा अन् समृद्ध निसर्ग ठरतोय या अनोख्या पाहुण्याचा अधिवास, जैवविविधतेची श्रीमंती अधोरेखित

पुढारी वृत्तसेवा

दिनेश कांबळे

डोळखांब: पावसाळा ओसरत असताना सह्याद्रीच्या डोंगररांगांवर निसर्गाची विविधरंगी उधळण सुरू झाली आहे. डोळखांब, देहणे, टेंभुर्ली, मांजरे, आजोबा, घाटघरपासून हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्यापर्यंतच्या डोंगररांगांमध्ये सध्या रानफुलांचा बहर पाहायला मिळत असून, याच निसर्गसंपन्न वातावरणात दुर्मीळ ‘हिरकणी टाचणी’ (क्लिफसाईड बांबूटेल) या निळ्याशार टाचणीचे दर्शन देहणे परिसरात होत आहे.

डोंगरातून खळाळत वाहणारे स्वच्छ झरे, त्याभोवतीचा गारवा आणि प्रदूषणापासून दूर असलेली नैसर्गिक परिसंस्था या अनोख्या कीटकासाठी पोषक अधिवास ठरत आहे.

सह्याद्रीच्या या पट्ट्यात पावसाळ्यानंतर रानफुलांचा बहर येतो आणि त्याचबरोबर असंख्य कीटक, फुलपाखरे आणि विविध जीवसृष्टीची लगबगही वाढते. डोंगरकपारीतून उगम पावणारे स्वच्छ झरे, त्यांचा थंडगार प्रवाह आणि दाट हिरवाईमुळे या परिसरात सूक्ष्म अधिवासांची निर्मिती होते.

अशाच झऱ्यांच्या परिसरात हिरकणी टाचणी दिसून येत असल्याने निसर्गप्रेमी आणि कीटक अभ्यासकांसाठी ही आनंदाची बाब ठरत आहे. फायलोनेउरा प्रवर्गातील या टाचण्यांच्या शेपटीवर बांबूवरील खुणांसारख्या रेषा आढळतात. त्यामुळे या समूहातील कीटकांना ‘बांबूटेल’ असे संबोधले जाते.

छोट्या कीटकांवर उपजीविका करणारी ही टाचणी परिसंस्थेतील अन्नसाखळीचा महत्त्वाचा भाग मानली जाते. हरिश्चंद्रगड परिसरातील डोळखांब, देहणे, टेंभुर्ली, मांजरे, आजोबा आणि घाटघर हा पट्टा जैवविविधतेने समृद्ध आहे.

पावसाळ्यात या भागातील डोंगर हिरवाईने न्हाऊन निघतात, तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये रानफुलांचा बहर संपूर्ण परिसराला वेगळेच रूप देतो. या फुलांभोवती फुलपाखरे, मधमाश्या, चतुर आणि टाचण्यांची वर्दळ वाढते. त्यात हिरकणी टाचणीचे दर्शन म्हणजे या परिसरातील निसर्गवैभवाची आणखी एक सुंदर नोंद मानली जात आहे.

स्वच्छ झरेच ठरतात ‘घर’

हिरकणी टाचणीच्या अधिवासासाठी स्वच्छ पाण्याचे झरे आणि त्याभोवतीचा नैसर्गिक गारवा अत्यंत महत्त्वाचा आहे.

डोंगरातून वाहणाऱ्या झऱ्यांच्या काठावरील खडक, ओलसर वातावरण आणि आजूबाजूची वनस्पती यामुळे या कीटकाला प्रजननासाठी पोषक वातावरण मिळते.

केरळमध्ये लागला होता शोध!

‘हिरकणी टाचणी’चा पहिला शोध केरळमधील पोनमुडीच्या दुर्गम पर्वतीय भागात लागला.

स्वच्छ झरे, गार आणि प्रदूषणमुक्त वातावरण हे या प्रजातीच्या अधिवासाचे प्रमुख वैशिष्ट्य आढळून आले.

आता याच वैशिष्ट्यांनी नटलेल्या शहापूरच्या डोळखांब, देहणे, टेंभुर्ली, हरिश्चंद्रगडाच्या डोंगररांगांतही ‘हिरकणी टाचणी’चे दर्शन होत आहे.

‘हिरकणी टाचणी’चे वैशिष्ट्य

  • टाचणीसारखी शारीरिक रचना

  • असणारा निळ्या रंगाचा कीटक.

  • अन्न : उपद्रवी छोटे-छोटे कीटक.

  • दुर्गम भागातील पर्यावरणीय परिसंस्था संतुलित असल्याचे दर्शविणारा कीटक.

  • पर्वतातून वाहणाऱ्या झऱ्यांच्या परिसरात

  • अधिवास आढळतो.

  • झऱ्यांच्या काठावरील खडकांवर रेंगाळून अंडी घालतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT