भिवंडी (ठाणे) : मुंबई महानगर प्रदेशचे प्रवेशद्वार असलेल्या यंत्रमाग उद्योग व त्यानंतर गोदाम हबमुळे वाढीस लागलेल्या भिवंडी शहरातील वाहतूक कोंडी सोडवणुकीसाठी शहरातील अवजड वाहनांना शहरात कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भातील अधिसूचना वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी प्रसिद्ध केली आहे.
गुजरातकडून मुंबईकडे व मुंबईकडून परत गुजरातकडे त्याचप्रमाणे गुजरातकडून नाशिककडे व नाशिककडून गुजरातकडे जाणार्या मार्गावरील भिवंडी शहर असल्याने या शहरातून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक संक्रमण सुरू असते. भिवंडी शहराची लोकसंख्या 13 लाख असून शहरात सर्व प्रकारची 4 लाख 51 हजार 683 वाहने आहेत. बाहेरून येणार्या वाहनांची संख्याही अधिक असल्याने शहरात येणार्या रस्त्यांवर होणार्या वाहतूक कोंडीचा नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवल्याने वाहतूक विभागाने अवजड वाहतुकीस मनाईची अधिसूचना काढली. अधिसूचना भंग करणार्या मोटर वाहन चालका विरुद्ध कारवाई करण्यात येईल.
प्रवेश बंद - 1
भिवंडी शहरात गुजरात वाडाकडून येणार्या व नाशिक मुंबई अंजूरफाटाकडे जाणार्या सर्व अवजड वाहनांना वंजारपट्टी नाका उड्डाणपूलावरून भिवंडी शहरात प्रवेश करण्यास कायमस्वरूपी प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग
सदर अवजड वाहने वंजारपट्टी पुलावरून डावीकडे वळण घेवून चाविंद्रा मार्गे वडपे येथून मुंबई नाशिक महामार्गावरून इच्छीत स्थळी जातील, तर वसई अंजूरफाटाकडे जाणारी वाहने चाविंद्रा येथून नाशिक मुंबई महामार्गावरून मानकोली मार्गे इच्छीत स्थळी जातील.
प्रवेश बंद - 2
कल्याण तसेच मुंबईकडून वाडा गुजरातकडे जाणार्या सर्व प्रकारच्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना राजनोली नाका येथे ‘कायमस्वरूपी प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग
सदर वाहने रांजनोली नाकाकडून मुंबई नाशिक महामार्गावरून वडपे येथून डावीकडे वळण घेवून चाविंद्रा वंजारपट्टी ब्रिज मार्गे वाडा गुजरातकडे जातील.
प्रवेश बंद - 3
अंजुरफाटा मार्गे वाडा गुजरात अथवा नाशिककडे जाणार्या सर्व प्रकारच्या (सहा चाकी वाहनांवरील) अवजड वाहनांना अंजुरफाटा येथे ‘कायमस्वरूपी प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग
सदर वाहने अंजुरफाटा वरून मानकोली मार्गे मुंबई नाशिक महामार्गाने इच्छित स्थळी जातील, तर वाडा गुजरातकडे जाणारी वाहने वडपे चाविंद्रा वंजारपट्टी उड्डाणपूल मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद - 4
तळवली नाकाकडून भिवंडीत येणार्या सर्व प्रकारच्या (सहा चाकी वाहनांवरील) सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना भिवंडी शहरात ‘कायमस्वरूपी प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग
सदर वाहने तळवली नाकाकडून खोणीगाव पारोळ फाटा वंजारपट्टी उड्डाणपूलावरून चाविंद्रा मार्गे नाशिक हायवेने इच्छित स्थळी जातील.