

नेवाळी : कल्याण शिळ रस्त्यावर मेट्रो- 12 च्या कामाने वेग घेतला आहे. मात्र या सुरु असलेल्या कामाला आता वाहनचालक देखील त्रासले आहेत. रस्त्याच्या दोन लेन मेट्रोच्या कामाने गिळंकृत केल्याने रस्ता अरुंद झाल्याने वाहतूक कोंडीची समस्यां मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. मात्र या सुरु असलेल्या कामाकडे प्रशासकीय यंत्रणा गांभीर्याने लक्ष देत नसल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अवघ्या काही मिनिटांचा अंतर पार करायला तासांचा अवधी जात असल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत.
वाहतूककोंडीचे जंक्शन
रिजन्सी दावडी चौक
सोनारपाडा
मानपाडा
रुणवाल गार्डन चौक
लोकसभा निवडणुकीच्या आधी मेट्रो 12 च्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. नव्याने तयार केलेला काँक्रीटचा रस्ता खोदून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र या कामासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या प्रत्येकी एक लेन कामाने गिळंकृत केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना या रस्त्यावरील प्रवास अत्यंत त्रासदायक वाट आहेत.त्यामुळे मनसेचे नेते माजी आमदार राजू पाटील यांनी मेत्तरो 12 साठी संपादित झालेल्या पुढील जागेत मेट्रोचे काम करण्याची सूचना प्रशासकीय यंत्रणेसह सत्ताधार्यांना केली होती.
मात्र या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा सर्वाधिक फटका आता अधिकच वाहनचालकांना बसू लागला आहे. दररोज सकाळ संध्याकाळ रुणवाल मानपाडा - गार्डन - काटई चौक या परिसरात वाहनांच्या रांगा लागत आहेत. मेट्रोची बॅरिकेटिंग आता रुणवाल गार्डन पर्यंत आल्याने वाहतूक कोंडीची समस्यां सर्वाधिक होऊ लागली आहे. मात्र सध्या लोकप्रतिनिधी देखील रस्त्यावरील वाहतूक कोंडीकडे लक्ष देताना दिसून येत नाहीत. एमएमआरडीए च्या ठेकेदाराकडून कल्याण शिळ रस्त्यावर मेट्रोच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र पुढील जमिनीचे देखील हस्तांतरण झालेले असताना तिकडे कामाला गती का ? देण्यात येत नाही असा प्रश्न साध्य उपस्थित झालेला आहे.
कल्याण शिळ रस्त्यावर रुग्णालय सर्वाधिक आहेत. त्यामुळे या परिसरातून रुग्णवाहिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. तर या रस्त्यावर डोंबिवली औद्योगिक क्षेत्र देखील आहे. त्यामुळे अग्निशमन दलाचे बंब देखील आगीची घटना झाल्यानंतर वेळेत पोहचत नाहीत. त्यामुळे या वाहतूक कोंडीच्या समस्येकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.