डोंबिवली : तुम्ही काहीही करा...मुख्यमंत्री आपल्या पाठीशी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गैरकृत्य करणाऱ्या मंत्र्यांचे आणि अशा अनेक आकांचे नेते आहेत. त्यामुळे निर्ढावलेल्या भाजपावाल्यांनी मामा पगारे यांच्या सारख्या ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्याला भर रस्त्यात साडी नेसून त्यांची बदनामी करण्याचे धाडस केले. आम्ही औरंगजेबाची देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर केलेली तुलना किती योग्य होती हे आता दिसते. जशी यापूर्वी मोगलाई होती, तशी आता राज्यात फडणवीसशाही आली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी शनिवारी कल्याणात बोलताना केली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या निषेध आंदोलनात कल्याण जिल्हा काँँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, प्रदेश नेते ॲड. नवीन सिंग, महिला संघटक कांचन कुलकर्णी, काँग्रेस पदाधिकारी ब्रीज दत्त, मामा पगारे, एकनाथ म्हात्रे उपस्थित होते.
भूषण गवईंसारख्या देशाच्या सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा झालेला प्रयत्न आणि या माध्यमातून देशाच्या सर्वोच्च व्यक्ति, संस्था आणि संविधानाचा करण्यात आलेला अवमान, तसेच दलित समाजातील असल्याने मामा पगारे यांच्यासारख्या ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्याला डोंबिवलीत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांंनी रस्त्यावरून अडवून त्यांना नेसविण्यात आलेली साडी या प्रकरणाचा निषेध करण्यासह पगारे यांच्याशी गैरकृत्य करणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी कायद्याने गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी कल्याण जिल्हा काँग्रेसतर्फे शनिवारी कल्याण येथे पोलिस उपायुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे आता आपण काहीही करू शकतो, अशी भावना त्यांच्या कार्यकर्त्यांची झाली आहे. अशा घटनांमुळे सर्वत्र अराजकसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आकांचा सर्वदूर संचार वाढला आहे. या आक्कांचे नेते फडणवीस आहेत. जशी यापूर्वी मोगलाई होती, तशी आता फडणवीसशाही आली आहे, अशी टीका प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी यावेळी बोलताना केली. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रकार आणि मामा पगारे यांचा भर रस्त्यात उपमर्द करण्याचा प्रयत्न हा जातीयतेचा प्रकार आहे. या प्रकरणांचा थेट संविधानाश संबंध आहे. संविधानावर विश्वास नाही. ज्यांना केवळ मारझोड, धाकदपटशावर विश्वास आहे, तीच मनुवादी वृत्ती आता डोके वर काढत आहे, असेही सकपाळ म्हणाले.
कोल्हापुरच्या हत्तीणीच्या माध्यमातून गेलेली अब्रू आता मुंबईत कबुतरांच्या माध्यमातून वाचविण्याचा प्रयत्न भाजपचा सुरू आहे. याऊलट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एक कबतुर संकुल उभारून मुक्या प्राण्यांना दया दाखवावी. कर्ज माफीचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पूर्ण करावे. मामा पगारेंप्रकरणी पोलिसांनी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घेतला नाहीतर आम्ही न्यायालयात दाद मागू आणि भाजप पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी आग्रही राहू, असेही प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी सांगितले.
गुन्हा दाखल होऊ नये म्हणून रडण्याचे नाटक - संदीप माळी
मामा पगारे यांनी संघाबाबत वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या विधानामुळे भाजपा पुन्हा आक्रमक झाली आहे. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मामा पगारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मामा पगारे हे ॲक्टर आहेत. मामा पगारे हा रडका माणूस आहे. गुन्हा दाखल होऊ नये म्हणून ते रडण्याचे नाटक करत आहेत. आम्ही अशा रडक्यांना भाव देत नाही. संघाबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशीही अपेक्षा संदीप माळी यांनी व्यक्त केली.