

उल्हासनगर : उल्हासनगर शहराच्या गल्ल्यागल्ल्यांत सध्या “कांदे, बटाटे, लसूण घ्या!”, “भाजी घ्या भाजी!” अशा भोंग्यांच्या आवाजांचा गोंगाट सतत ऐकू येतो. या आवाजामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दुपारी विश्रांती घेणारे ज्येष्ठ नागरिक, अभ्यास करणारे शालेय विद्यार्थी, नवजात बालके आणि आजारी व्यक्ती सगळ्यांच्या शांततेवर या भोंग्यांच्या आवाजाने गदा आणली आहे. शहरात सर्वत्र फेरीवाल्यांचा आवाज वाढत चालल्याने अखेर नागरिकांच्या मागणीवरून शिवसेना ग्राहक संरक्षक कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेकडे तक्रार नोंदवून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
ग्राहक संरक्षक कक्षाचे ठाणे जिल्हा संघटक प्रथमेश पुण्यार्थी यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर शहर संघटक भाऊसाहेब सावंत यांनी आयुक्त मनिषा आव्हाळे यांना याबाबत निवेदन सादर केले. त्यांनी नमूद केले की, दुपारी 12 ते सायं 5 या वेळेत गल्लीबोळांत फिरणारे फेरीवाले स्पीकर लावून विक्री करताना अतिप्रमाणात आवाज निर्माण करतात. या कर्णकर्कश ध्वनीमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, शहरातील शांती आणि आरोग्यावर परिणाम होत आहे.
भाऊसाहेब सावंत यांनी पुढे म्हटले की, अनेक वयोवृद्ध नागरिकांना दुपारची वामकुशी घेणे शक्य होत नाही. शालेय मुलांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येत नाही, तसेच नवजात बालके आणि दवाखान्यातील रुग्णांना या आवाजामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो. आवाज प्रदूषणाच्या या वाढत्या समस्येवर उल्हासनगर महानगरपालिकेने कठोर पावले उचलली पाहिजेत.
त्यांनी सुचवले की, महानगरपालिकेने भोंगे वापरणाऱ्या फेरीवाल्यांसाठी नियमावली तयार करावी आणि त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. आवाज नियंत्रित ठेवण्यासाठी ठराविक डेसिबल मर्यादा लागू करावी, तसेच फेरीवाल्यांना नोंदणीशिवाय स्पीकर वापरण्यास मज्जाव करावा. स्थानिक नागरिकांमध्येही या विषयावर संताप व्यक्त होत आहे. अनेक नागरिकांच्या मते, उल्हासनगर शहरात आधीच वाहतूककोंडी आणि बांधकामामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यात फेरीवाल्यांच्या भोंग्यांचा आवाज म्हणजे नागरिकांच्या सहनशीलतेचा अंतच आहे.
आमचा हेतू फेरीवाल्यांचा रोजगार थांबवण्याचा नाही, परंतु त्यांच्या व्यवसायामुळे इतरांच्या जीवनावर परिणाम होऊ नये हेही महत्त्वाचे आहे. म्हणूनच ‘व्यवसाय होऊ द्या, पण शांतता राखा’ हा संदेश आम्ही देत आहोत. फेरीवाल्यांचे भोंगे दिवसभर कानठळ्या बसवणारा आवाज करतात, ज्यामुळे वृद्ध, बालकं आणि आजारी लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. महानगरपालिकेने याकडे तातडीने लक्ष देऊन भोंगे वापरण्यावर बंदी आणावी आणि नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
भाऊसाहेब सावंत, ग्राहक संरक्षक संघटक, उल्हासनगर