ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर रस्त्यावर सुरू असलेल्या विविध कामांची आज महापालिका आयुक्तांनी संयुक्त पाहणी केली. सद्यस्थितीत सुरू असलेली कामे 30 मेपर्यंत पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, एमएमआरडीए आदी यंत्रणांना दिले.
पूर्व द्रुतगती महामार्ग, कापुरबावडी जंक्शन, सेवा रस्ता आणि गायमुख घाट परिसरातील कामांची पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पाहणी करण्यात आली. यावेळी संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या पाहणीत कापुरबावडी जंक्शन, वर्तकनगर, चितळसर पोलीस स्टेशन परिसर, मानपाडा ब्रिज, ब्रह्मांड चौक, डोंगरपाडा, आनंदनगर जंक्शन, कासारवडवली, ओवळा चौक, गायमुख चौपाटी ते गायमुख जकात नाका आणि गायमुख घाट या ठिकाणांचा समावेश होता.
गायमुख चौपाटीसमोरील रस्त्याच्या साईड शोल्डरचे तातडीने काँक्रीटीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अमृत जलवाहिनी, मेट्रो पिलरखालील काँक्रीटीकरण, सर्व्हिस रोड मर्जिंग, पेव्हर ब्लॉक, स्लिप रोड दुरुस्ती, चौकांचे काँक्रीटीकरण, विद्युत पोल शिफ्टिंग आणि पाईपलाईन स्थलांतर यांसारख्या कामांचा आढावा घेऊन अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
गायमुख ते कापुरबावडी मार्गावरील नागलाबंदर, आनंदनगर चौक, वावचळ ब्रिज, कासारवडवली, गवळीपाडा मेट्रो स्टेशन परिसरात मर्जिंग, रस्ते दुरुस्ती व पुलांची पाहणी करण्यात आली. मर्जिंगमध्ये अडथळा ठरणाऱ्या पाणी पाईपलाईन आणि विद्युत पोल तातडीने स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महावितरण अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे निर्देश दिले. तसेच फूटपाथवरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश देण्यात आले. घोडबंदर रोड विलीनीकरण झालेल्या रस्त्यांवर आयलँड, बसबे, रिक्षास्टॅण्ड तयार करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पार्किंग, नो पार्किंग आदी दिशादर्शक फलक लावण्याचे सूचनाही यावेळी आयुक्तांनी दिल्या.