Accident News Pudhari
ठाणे

Accident News: विरुद्ध दिशेने येणाऱ्या काँक्रीट मिक्सरने तरुणाला चिरडले; 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

फरार चालकाविरोधात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड: घोडबंदर येथील जे.पी. इन्फ्रा मार्गावर रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करत भरधाव गाड्या चालवल्या जात असल्याचे समोर आले आहे. रविवारी रात्री आपल्या घराबाहेर दुचाकीवरून निघालेल्या 17 वर्षीय तरुणाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका भरधाव सिमेंट काँक्रीट मिक्सरने जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात अंश सुजित बागल (वय 17) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गाडी चालक हा फरार झाला असून त्याच्या विरोधात काशीगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंश हा घोडबंदर येथील अपना घर या गृहसंकुलात राहत होता. रविवारी रात्रीच्या सुमारास तो आपल्या दुचाकीवरून फेरफटका मारण्यासाठी संकुलाबाहेर पडला होता. संकुलाबाहेरील रस्त्यावर आपली गाडी वळवत असतानाच, समोरून विरुद्ध दिशेने (राँग साईडने) येणाऱ्या एका अवजड सिमेंट काँक्रीट वाहकाने त्याला भीषण धडक दिली.

धडक इतकी जोरदार होती की, अंशची दुचाकी वाहनाखाली चिरडली गेली, तर अंश काही अंतरावर फेकला गेला. डोक्याला आणि शरीराला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच अंत झाला. या घटनेची माहिती मिळताच काशिगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. याप्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर चालक वाहन सोडून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

अवजड वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे आणि विरुद्ध दिशेने वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. फरार चालकाचा शोध सुरू आहे, अशी माहिती काशिगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी दिली. या भीषण अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

जे.पी. इन्फ्रा आणि अपना घर परिसरात अवजड वाहने सातत्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन करून विरुद्ध दिशेने धावत असतात. याबाबत वारंवार तक्रारी करूनही पोलिसांनी किंवा महापालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.

प्रशासनाच्या याच दुर्लक्षामुळे एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. मीरा-भाईंदर शहरात सध्या सुरू असलेल्या विविध विकासकामांसाठी सिमेंट काँक्रीट मिक्सरची मोठी वर्दळ असते. हे चालक वेळ वाचवण्यासाठी अनेकदा राँग साईडने आणि अतिशय भरधाव वेगाने गाड्या चालवतात.

यापूर्वीही अशा वाहनांमुळे अनेक अपघात झाले असून अनेकांना अपंगत्व आले आहे किंवा जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी अशा बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई करून या अपघातावर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT