ठाणे : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत ठाणे जिल्ह्यात करण्यात आलेल्या ‘आवास प्लस’ या सर्वेक्षणातून 39 हजाराहून अधिक कुटुंबे घरकुलापासून वंचित असल्याचे वास्तव पुढे आले आहे.
घरकुलासाठी पात्र असूनही 2018 च्या प्रतीक्षा यादीतून वगळल्याने व सिस्टीमद्वारे अपात्र ठरवण्यात आल्याने ही कुटुंबे हक्काच्या घरकुलास मुकली आहेत. याबाबत सर्व कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसर्या टप्प्यातून लाभ मिळवून देण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना हक्काचे पक्के घर मिळावे व त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी शासनाने 2012 मध्ये गाव निहाय ‘आवास प्लस’ हे ऑनलाइन सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणाच्या आधारे 2018 मध्ये घरकुलासाठी गावनिहाय लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली होती. या प्रतीक्षा यादीतून लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून घरकुलाचा लाभ टप्प्याटप्प्याने देण्यात येत होता. 2018 मध्ये झालेल्या आवास प्लस सर्वेक्षणच्या प्रतिक्षा यादीमध्ये अनेक पात्र कुटुंबाना विविध तांत्रिक कारणांमुळे पात्र असूनही अपात्र ठरविण्यात आले.
अंबरनाथ 1,322
भिवंडी 9,452
कल्याण 1,427
मुरबाड 14,603
शहापूर 12,937
एकूण 39,741
प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसर्या टप्प्यासाठी ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यातील 18 हजार 248 घरकुलांचे उद्दिष्टे देण्यात आले होते. त्यापैकी 17 हजार 975 लाभार्थी घरकुलांसाठी पात्र झाले असून या लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा झाला असल्याची माहिती प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी दिली. तसेच 8 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देखील देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्याद्वारे मार्च 2025 पर्यंत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून 39 हजार 741 लाभार्थ्यांना घरकुलाचे नितांत आवश्यकता असून, त्यांनंतर तांत्रिक कारणामुळे अपात्र ठरवण्यात आल्याचे समोर आले. या गरजू लाभार्थ्यांना आवास योजनेच्या दुसर्या टप्प्यातून लाभ मिळणार असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ठाणे येथे सांगितले.