

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा-2 मध्ये राज्यात 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र तर 10 लाख लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रथम हप्ता वितरण करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात शनिवारी (दि. 22) पार पडला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पाच लाभार्थ्यांना मंजुरी पत्र अमित शहा यांच्याहस्ते वितरण करण्यात आले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते.
राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 1 अंतर्गत मागील सात वर्षांत 13,57,564 उद्दिष्टे होते. त्या तुलनेत सन 2024-25 या एका वर्षामध्ये टप्पा 2 अंतर्गत महाराष्ट्र राज्याला 20 लाख घरकुलाचे उद्दिष्ट प्राप्त झाले. सन 2024-25 मध्ये मंजूर झालेल्या घरकुलाच्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी स्वतःची जागा उपलब्ध नसेल तर पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत 500 चौरस फुट जागेसाठी प्रति लाभार्थी एक लाख रुपये जागा खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. 20 लाख घरकुल मंजुरीचे आदेश 28,000 ग्रामपंचायतीमध्ये एकाच दिवशी वाटप करण्यात येत आहे.
याबाबत राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी माहिती देताना सांगितले की, राज्यात सन 2024-25 या वर्षात पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 20 लाख घरकुल मंजुरीचे उद्दिष्ट ठेवले. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी केंद्र शासनाकडे विशेष पाठपुरावा केला होता. 20 लाख घरे बांधकामासाठी ग्रामविकास विभागाला 100 दिवसांचा विशेष कृती कार्यक्रम आखून दिला. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने 20 लाख घरकुलांचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या राज्यस्तर ते ग्रामस्तरापर्यंत सर्व यंत्रणांनी घरकुल मंजुरी तसेच प्रथम हप्ता वितरणासाठी जागा उपलब्धता, लाभार्थ्यांचे बँक खाते उघडणे या अनुषंगीक बाबींसाठी विशेष मोहीम हाती घेतली.