भिवंडी (ठाणे): सुमित घरत
दर्श अमावस्या अर्थातच खवय्यांची ‘गटारी’ ची धूम सर्वत्रच पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे अनेकांनी रविवार (दि.20) पासूनच गटारी साजरी करण्यास सुरुवात केली आहे.
दर्श अमावस्या 24 जुलै रोजी असून 25 तारखेपासून श्रावणमास सुरू होत आहे. परंतु 24 जुलै रोजी गुरुवार उपवासाचा दिवस असल्याने नागरिकांनी बुधवारी 23 जुलै रोजी गटारीची जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच मच्छीचे भाव दुपटीने वधारले असून मद्याचे दरही काही प्रमाणात वाढले आहेत. यामुळे दरवर्षी पेक्षा यावर्षी गटारी सर्वांसाठीच महागणार आहे. परंतु या सर्वांपेक्षा विशेष म्हणजे सद्यस्थितीत ओल्या पार्ट्यांसाठी ट्रेंड्स ठरत असलेल्या फार्म हाऊसची क्रेझ ठाणे जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
स्विमिंग पूल, तरुणाईसह ज्येष्ठांमध्ये इन्स्टावर रिल्स बनवण्याची उत्सुकता, डिझेवर नाच गाणी या व अशा विविध कारणांमुळे फार्म हाऊसचा वाढता प्रभाव प्रामुख्याने दिसून येत आहे. तर गटारीच्या या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील अनेक फार्महाऊसेस फुल्ल झाल्याचे पहायला मिळत असून फॉर्म हाउस बुकिंगचे दर दुपटीने वाढल्याचे समजते. त्यामुळे फार्म हाऊस मालकांना अच्छे दिन आल्याचे बोलले जात आहे.
कारण एरवी बुकिंगसाठी 7 ते 8 हजार रुपये दर असणारे फार्म हाऊसेसचे दर गटारी निमित्त 12 ते 15 हजार रुपयांवर पोहचले आहेत. परंतु असे असतानाही तळीरामांसह तरुणाई व ज्येष्ठांचीही पसंती या फार्म हाऊसेसला मिळत असल्याचे ठाणे जिल्ह्यासह भिवंडीतून उघड होत आहे.एकीकडे गटारीच्या तोंडावर बाजारात मांस, मच्छीचे भाव कडाडले असतानाच दुसरीकडे फार्म हाऊस मालकांनी खाल्लेला भाव यामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. मात्र असे असतानाही खवय्यांमध्ये गटारीची क्रेझ शिगेला पोहचली असून गटारी साजरी करण्यासाठी खवय्यांनी नक्कीच कंबर कसली आहे.
एरवीप्रमाणेच गटारीसाठीही दर एकसारखेच घेत असून एका दिवसासाठी भाव वाढवून घेत नाही. परंतु काही ठिकाणी गटारीच्या पार्श्वभूमीवर फार्म हाऊसेसचे दर अव्वाच्या सव्वा आकारले जात आहेत.रणजित पाटील, पाटील फार्महाऊस, लाखिवली