

नाशिक : खुनातील संशयित आरोपींना न्यायालयातून नाशिकरोड कारागृहात नेत असताना नियमबाह्य पद्धतीने एका हॉटेलमध्ये पार्टी करणाऱ्या शहर पोलिस दलातील तिघा कर्मचाऱ्यांना संविधानाच्या कलम ३११(२) (ब) नुसार बडतर्फ करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
गुन्हेगारांसोबत पोलिसांचे संबंध खपवून घेतले जाणार नाही असा संदेश पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी कारवाईतून दिला आहे. युवराज पाटील या कर्मचाऱ्यासही गुन्हेगारांशी संपर्क ठेवल्याने गत आठवड्यात बडतर्फ करण्यात आले आहे.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून कैद्यांना न्यायालयात आणून पुन्हा न्यायालयातून कारागृहात सोडण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलिस पथकास कैदी पार्टी म्हटले जाते. त्यानुसार शनिवारी (दि.१७) पोलिस मुख्यालयातील पोलिस हवालदार पद्मसिंग हटेसिंग राऊळ, पोलिस शिपाई विकी रवींद्र चव्हाण व पोलिस शिपाई दीपक रवींद्र जठार यांच्यासह आणखी एक पोलिस कर्मचाऱ्यावर कैदी पार्टीची जबाबदारी हाेती. नाशिकरोड कारागृहातील प्रफुल्ल विजय पाटील (२१) व कुंदन घडे या दोघांसह आणखी एका खुनाच्या गुन्ह्यातील संशयितास न्यायालयात हजर करून पुन्हा कारागृहात नेण्याची जबाबदारी कैदी पार्टीवर होती. मात्र न्यायालयीन कामकाज पुर्ण झाल्यानंतर तिघा पोलिसांनी प्रफुल्ल आणि कुंदन यांच्यासह उपनगर भागातील एका हॉटेलात मांसाहारावर ताव मारला. दरम्यान, तेथून एका नागरिकाने थेट पोलिस आयुक्तांना याची माहिती दिल्यानंतर सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख व वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या पथकाने हॉटेलमध्ये जाऊन पाहणी केली असता तिघे पोलिस दोघा कैद्यांसह पार्टी करताना आढळून आले. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत तिघांवर बडतर्फीची कारवाई केली आहे.
पोलिस तपासात कैदी पार्टीसाठी चौघांची नेमणूक केली होती. त्यापैकी तिघे पोलिस दोन कैद्यांसोबत एका हॉटेलात 'पार्टी'साठी थांबले. त्यावेळी चौथा पोलिस कर्मचाऱ्याने पार्टीत सहभागी होण्याएेवजी त्याने रिक्षातून तिसऱ्या कैद्यास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात पोहचवले. तर दीपक जठार याने त्याच्याकडील एमएच १५ ईडब्ल्यू ९९९० क्रमांकाच्या कारचा वापर इतर दोघा कैद्यांना कारागृहात साेडवण्यासाठी केला. तसेच विकी चव्हाण या पोलिसाने पार्टीचे बिल भरल्याचेही तपासात उघड झाले.
भारतीय संविधानातील कलम ३११ (२) नुसार एखाद्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्याची त्याच्या चुकीसंदर्भात योग्य चौकशी करुन त्याचे म्हणणे मांडण्याची संधी द्यायला हवी. मात्र, अपवादात्मक परिस्थितीत त्याच्यावरील फौजदारी आरोपांमुळे त्यास दोषी ठरवून थेट बडतर्फ करता येते, काढून टाकले जाते किंवा त्याचे पद कमी केले जाते. तसेच कलम ३११ (२) अंतर्गत चौकशीची आवश्यकता नाही. त्यावेळी घटक प्रमुख किंवा वरिष्ठ अधिकारी तशी लेखी नोंद करून संबंधितास बडतर्फ करु शकतात.
कैदी पार्टीचा प्रमुख म्हणून पद्मसिंग राऊळ याच्यावर जबाबदारी होती. मात्र त्याने पार्टीतील महिला पोलिस शिपाई व एका पुरुष कर्मचाऱ्यास परस्पर गैरहजर राहण्याची परवानगी दिली. याबाबत वरिष्ठांना कोणतीही कल्पना दिली नाही. तसेच कैद्यांना मोटार परिवहन विभागाने वाहन न वापरता खासगी कार व रिक्षाचा वापर केला. कैद्यांना हॉटेलमध्ये जेवनासाठी नेले, कैद्यांना नातलगांसोबत भेटण्याची संधी उपलब्ध करून दिली. गुन्हेगारांसोबत घनिष्ठ संबंध ठेवल्याचाही ठपका राऊळसोबत इतरांवर ठेवण्यात आला.