Kalyan Gas Pipeline Work Pudhari
ठाणे

Kalyan Gas Pipeline Work: कल्याणमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम बंद; रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रिक्षाचालकांचा व्यवसाय गॅसवर

पादचाऱ्यांना करावी लागतेय तारेवरची कसरत

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: कल्याण पूर्वेकडील तिसगाव नाका ते आझाद प्लंबर या दरम्यान सुरू असलेल्या गॅस पाईपलाईन टाकण्याच्या कामावर अखेर ब्रेक लागला आहे. नियोजित 80 फूट रूंद रस्त्याच्या मधोमध गॅसची लाईन टाकण्याचा प्रकार दैनिक पुढारीने 30 मेच्या अंकात सचित्र वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची दखल घेतली असून सध्या हे काम पूर्णपणे थांबविण्यात आले आहे. मात्र या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत तर आहेच शिवाय रिक्षाचालकांचा व्यवसाय रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गॅसवर आला आहे.

या रस्त्याच्या मधोमध महावितरण गॅस कंपनीकडून अचानकपणे खोदकाम सुरू करण्यात आले होते. केंद्र शासनाच्या 24 मार्चच्या निर्देशांनुसार भविष्यात रस्ता रुंदीकरण होणाऱ्या मार्गांवर सार्वजनिक सुविधांची कामे नियोजनपूर्वक करण्याची अपेक्षा असताना, नियोजित 80 फूट रुंद रस्त्याच्या अगदी मधोमध गॅस लाईन टाकण्याचे काम सुरू झाल्याने स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि व्यापाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.

या संदर्भातील स्मार्ट सिटीच्या नावाखाली जनतेच्या पैशांचा चुराडा या मथळ्याखाली वृत्त दैनिक पुढारीमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित गॅस कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर सुरू असलेले काम तातडीने थांबविण्यात आले. संपूर्ण प्रकल्पाचे पुनःसर्वेक्षण करून गॅसची लाईन नेमकी कुठे आणि कोणत्या पद्धतीने टाकायची याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मात्र काम बंद झाले असले तरी नागरिकांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. तिसगाव नाका ते आझाद प्लंबर या संपूर्ण मार्गावर रस्त्याच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. खोदलेल्या खड्ड्यांमुळे आणि रस्त्यावर टाकून ठेवलेल्या माती-मुरूमांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. वाहनचालकांना मोठी कसरत करत प्रवास करावा लागत असून वाहतूकही संथ गतीने सुरू आहे.

याचा सर्वाधिक फटका या परिसरातील रिक्षाचालकांना बसत आहे. तिसगाव रिक्षा स्टँडवरील चालकांनी सांगितले की, खराब रस्त्यामुळे रिक्षांच्या टायर्स, सस्पेन्शन, शॉकॲब्झॉर्व्हर आणि इतर यांत्रिक भागांवर अतिरिक्त ताण येत आहे. परिणामी देखभाल/दुरूस्तीचा खर्च वाढला असून व्यवसायातून मिळणारे उत्पन्न कमी होत आहे. अनेक प्रवासी खराब रस्त्यामुळे या मार्गाने प्रवास करणे टाळत असल्याचेही रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.

चिखलाचे साम्राज्य निर्माण होण्याची भीती

मान्सूनपूर्व काळातच रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. हवामान खात्याने आगामी दिवसांत पावसाची शक्यता वर्तविलेली असताना पाऊस सुरू झाल्यास या संपूर्ण मार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पादचारी, दुचाकीस्वार, तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.

गॅस वितरण कंपनी आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांकडे तातडीने रस्ता पूर्ववत करण्याची स्थानिक रहिवाशांनी मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारची कामे करताना रस्ता रुंदीकरण, वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊनच नियोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

काम बंद झाले असले तरी खोदकामामुळे निर्माण झालेल्या समस्यांचे काय ? हा प्रश्न सध्या तिसगावकरांच्या चर्चेचा विषय बनला असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT